एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळी बी. के. रोड, शाहूनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून दीड लाखाचा ऐवज पळविण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून गुरुवारी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रमेश तरळे यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. 22 ऑक्टोबर रोजी रात्री 10 पासून 24 ऑक्टोबरच्या सकाळी 10 यावेळेत ही घटना घडली असून बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. बेडरूममधील तिजोरी व लॉकर फोडून दागिने व रोकड पळविण्यात आली आहे.
रमेश यांच्या घरातील 14 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा, 93 हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 49 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. यासंबंधी गुरुवारी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ पुढील तपास करीत आहेत.
ऐन दिवाळीत चोरीची ही घटना घडली आहे. बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. खासकरून उपनगरांतील बंद घरे चोरटय़ांनी लक्ष्य बनविली आहेत. गुन्हेगारांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घराला कुलूप लाऊन परगावी जाणेही कठीण बनले आहे.