सर्व भाजप विरोधी नेते एकवटले : म्हापशात बोडगेश्वराच्या प्रांगणात होणाऱया सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / म्हापसा
काँग्रेसच्या आठ आमदारांनी फुटून भाजपात प्रवेश केला. आपले संख्याबळ वाढविण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते, हे दाखवून दिले. मतदारांनी विश्वासाने आमदारांना निवडून दिले, मात्र मतदारांचा विश्वासघात करून आमदारांनी पक्षात फूट पाडून भाजपात दाखल झाले. या फुटीरांना धडा शिकविण्यासाठी श्री देव बोडगेश्वराच्या प्रांगणात रविवारी 23 रोजी स. 11 वा. फुटीरांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते विजय भिके यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे प्रतिनिधीत्व खासदार फ्रान्सिस सार्दीन यांच्यासह अन्य काँग्रेस आमदार नेते, गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई, कार्लुस आल्वारीस फरेरा, प्रदेशाध्यक्ष करणार आहेत. पत्रकार परिषदेत व्यासपीठावर गोवा फॉरवर्ड प्रवक्ते दुर्गादास कामत, काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे, शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, मयेचे उमेदवार संतोष कुमार सावंत, प्रिया राठोड, जवाहरलाल शेटय़े, सुदेश तिवरेकर, फिरोज खान, सुभाष केरकर, सितेश मोरे, योगेश केळकर, सुशांत नाईक, मनोद सावंत, नंदू नागवेकर आदी उपस्थित होते.
भाजपला सत्तेचा माज चढला आहे. ते अन्य गोष्टीकडे लक्ष देत नाही. यासाठी 23 रोजी सकाळी 11 वा. बोडगेश्वर प्रांगणातील रस्त्यावर फुटीर आमदारांच्या प्रतिमांचे दहन करणार आहे. सर्वांनी येथे येऊन भाजप व फुटीर आमदारांविरुद्ध रोष व्यक्त करावा. निवडून येण्याचे सोडूनच द्या, त्यांना मान खाली घालून समाजात फिरावे लागेल, अशी स्थिती फुटीर आमदारांवर आणणार आहोत, असा हल्लाबोल विजय भिके यांनी केला.
गोवा फॉरवर्डचे प्रवक्ता दुर्गादास कामत, गोवा शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत, काँग्रेसचे प्रवक्ता संजय बर्डे, जवाहरलाल शेटय़े आदींनी भाजपवर टीका करून या फुटीर आमदार प्रतिमा दहन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.