वृत्तसंस्था/ माँट्रियल (कॅनडा)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पाबेलो बुस्टाने बिगरमानांकित डॅनियल इव्हान्सचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता बुस्टा आणि आठवा मानांकित हुरकेझ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बुस्टाने इव्हान्सचा 7-5, 6-7(7-9), 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. बुस्टाला या सामन्यातील विजयासाठी तब्बल तीन तास झगडावे लागले. दुसऱया उपांत्य सामन्यात हुबर्ट हुरकेझने कॅस्पर रुडचा 5-7, 6-3, 6-2 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये हुरकेझच्या कामगिरीत सातत्य दिसून येते. आता अंतिम सामन्यात त्याची स्पेनच्या बुस्टासमोर सत्त्वपरीक्षा ठरेल.