वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीज क्रिकेट मंडळाने पुरुषांच्या वरिष्ठ आणि युवा निवड समितीमध्ये इंग्लंडचे माजी क्रेकेटपटू रोलँड बुचर यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. क्रिकेट विंडीजतर्फे ही घोषणा शुक्रवारी उशिरा करण्यात आली.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि फलंदाज रोलँड बुचर यांनी इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये मिडलसेक्स क्लबकडून 15 वर्षे आपला सहभाग दर्शविला होता. सोमवारी विंडीज क्रिकेट मंडळ संचालकांच्या झालेल्या बैठकीत बुचर यांच्या निवड समिती सदस्य पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. विंडीज क्रिकेट मंडळाकडून दिलेली ऑफर बुचर यांनी स्वीकारली असल्याचे सांगण्यात आले. विंडीज क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे बुचरने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
विंडीजच्या वरिष्ठ पुरुष निवड समिती पॅनेलचे नेतृत्व डेस्माँड हेन्स यांच्याकडे असून युवा निवड समितीचे नेतृत्व रॉबर्ट हेन्स यांच्याकडे राहणार आहे. 2004 साली बुचर यांची बार्बाडोसमधील विंडीज क्रीडा विद्यापीठाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये रोलँड बुचर पहिले कृष्णवर्णीय खेळाडू म्हणून ओळखले गेले. 1981 साली बुचरनी कसोटी पदार्पण विंडीज संघाविरुद्ध केले असून त्यांनी 3 कसोटी आणि 3 वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी 277 प्रथमश्रेणी सामन्यात 12 हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत.