एका अहवालामधून माहिती : लहान शहरांमध्ये ही मागणी 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे संकेत
वृत्तसंस्था /मुंबई
आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत देशातील जुन्या कार्सचा बाजार (सेकंड हँड कार मार्केट) 19.5 टक्के चक्रवाढ वार्षिक दराने वाढण्याची अपेक्षा आहे. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, देशातील सेकंड हँड कारची बाजारपेठ सध्या 23 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीची आहे.
2026 पर्यंत देशातील छोटय़ा शहरांमध्ये या कार्सची मागणी वार्षिक 30 टक्के दराने वाढू शकते, असे अहवालात म्हटले आहे. तर देशातील प्रमुख 40 शहरांमध्ये वापरलेल्या कारची मागणी दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
इंडियन ब्लूबुक आणि दास वेल्टऑटो यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 साठी सेकंड हँड कार आणि बाईक उद्योग अहवालाच्या 5 व्या आवृत्तीनुसार, या क्षेत्रातील वाढ अनेक कारणांमुळे होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये प्रमाणित कारची उपलब्धता, कमी कालावधीत नवीन मॉडेल लॉन्च करणे इत्यादींचा समावेश आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशात 35 लाखांहून अधिक सेकंड-हँड कार विकत घेतल्या गेल्या. हा आकडा 2020-21 या आर्थिक वर्षातील विक्रमी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्याचवेळी, याच कालावधीत जगभरात चार कोटींहून अधिक सेकंड-हँड कार विकल्या गेल्या असल्याचेही या अहवालामध्ये नमूद केले आहे.