राज्य सरकारचा आदेश ः सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांना नियम बंधनकारक
लखनौ / उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये महिलांसाठी आता संध्याकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत डय़ुटी करण्याची सक्ती करता येणार नाही. हा नियम सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांना लागू असेल. योगी सरकारने यासंबंधी आदेश जारी केला आहे. सदर नियम न पाळल्यास दंडापासून तुरुंगापर्यंत शिक्षा होऊ शकते. कोणत्याही कारणास्तव महिला कर्मचाऱयाची डय़ुटी संध्याकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत करायची असेल, तर त्यासाठी तिची लेखी परवानगी घ्यावी लागेल, असेही सरकारने म्हटले आहे.
सर्व जिह्यांमध्ये या सरकारी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश महिला कॉल सेंटर्स, हॉटेल इंडस्ट्रीज आणि रेस्टॉरंटमध्ये संध्याकाळी 7 नंतर काम करतात. कॉल सेंटर्स आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बरेचसे काम रात्रीच्या वेळी होते. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेला संध्याकाळी 7 नंतर डय़ुटी करायची नसेल तर व्यवस्थापन तिला थांबवू शकत नाही. यामध्ये कंपनी किंवा संस्थेचा परवानाही रद्द होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
महिलेची परवानगी न घेता रात्रीच्या वेळी डय़ुटी लावल्यास थेट कारवाई होणार आहे. सरकारच्या नियमावलीनुसार जर एखाद्या महिलेने संध्याकाळी 7 नंतर काम करण्यास नकार दिला तर कंपनी किंवा संस्था तिला कामावरून काढून टाकू शकत नाही. महिला कर्मचाऱयाच्या लेखी संमतीनंतर ती रात्रीच्या वेळेत काम करू शकते. त्यादरम्यान कंपनी किंवा संस्थेला घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर मोफत कॅबची सुविधा द्यावी लागेल. जर एखाद्या कंपनीने असे न केल्यास ते कामगार कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. तसेच दंडापासून ते तुरुंगापर्यंत शिक्षेस पात्र ठरेल, असे अतिरिक्त मुख्य सचिव कामगार सुरेश चंद्र यांनी सांगितले.