Tarun Bharat

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील 19 मंत्र्यांकडेच उर्वरीत जिह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविल्याने नव्याने होणाऱया मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यातच अतिरीक्त पालकमंत्री म्हणून जबाबदारी देताना भाजपची पुन्हा एकदा सरशी झाल्याचे दिसत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिह्यांचे पालकत्व देण्यात आले आहे.

राज्यातील एकूण 36 पैकी 15 जिह्यांचे पालकमंत्री शिंदे गटाला देण्यात आले असून आता विरोधकांनी पुन्हा एकदा शिंदे गटात नाराजी असल्याच्या तर भाजपच्या वाटय़ाला आलेल्या पालकमंत्री पदावरुन धुसफुस सुरू असल्याचा आरोप करण्यास सुरूवात केली आहे.

पितृपक्ष संपण्याआधीच शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उर्वरीत जिल्ह्यांची अतिरीक्त जबाबदारी देत पालकमंत्र्यांची घोषणा केली, ही घोषणा केल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सप्टेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा नवीन विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा होती, जर मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित असता तर अतिरीक्त जिह्यांची पालकमंत्री म्हणून सरकारने घोषणा केली नसती, त्यामुळे आता हा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता असून दिवाळीनंतर किंवा नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नाराज असलेल्या आणि शब्द दिलेल्या आमदारांची नाराजी दूर करावी लागणार आहे.

नव्याने जर मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि बच्चु कडू यांनी मंत्रीपदाचा त्याग करुन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला मात्र त्यांचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही, यातून कडू यांनी शिंदे गटाला अधुन मधून घरचा आहेर दिला. तसेच आपल्याला सप्टेंबरमध्ये गणपतीनंतर होणाऱया मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करणार असल्याचा शब्द दिल्याचे कडू यांनी सांगितले होते. मात्र आता या विस्ताराबाबतच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने सरकार टिकवण्यासाठीचे संख्याबळ मजबूत असल्याने अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? हा प्रश्न आहे.

भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची वाट बघत अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार आहेत, त्यात मूळ भाजपपेक्षा बाहेरुन आलेल्या आणि भाजपवासी झालेल्यांची अधिक चर्चा असल्याने नाराज आणि धुसफुसीची शक्यता लक्षात घेता भाजप मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किती आग्रही आहे हा सवाल उपस्थित होत आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात असलेले दिपक केसरकर आणि संजय राठोड हे उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नव्हते मात्र त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात लॉटरी लागली. त्यामुळे आता बच्चु कडू, संजय शिरसाट यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे,

मंत्र्यांकडे पालकमंत्री म्हणून अतिरीक्त जबाबदारी

पितृपक्ष सुरू असतानाच उर्वरीत जिह्यांचे पालकमंत्री जाहीर करताना आपल्या 19 मंत्र्यांकडे अतिरीक्त जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली अशा 6 जिह्यांची जबाबदारी दिली असून फडणवीस हे विदर्भाचेच पालकमंत्री झाले आहेत, तर फडणवीस यांच्या मर्जीतील असणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धुळे,लातुर आणि नांदेड या 3 जिह्यांची जबाबदारी दिली आहे. जिह्याच्या दृष्टीने पालकमंत्री हा महत्त्वाचा दुवा असतो, जिल्हा नियोजन निधी, नियोजन बैठका, जिल्ह्य़ाच्या विकास कामांसाठी अतिरीक्त निधी आणणे, अनेक जिह्यांचा चेहरामोहरा पालकमंत्र्यांनी त्यांच्या काळात बदलल्याची उदाहरणे राज्यात आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांचे महत्त्व केवळ 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला झेंडा फडकवणे इतकेच नसते, अनेक पालकमंत्री हे आठवडय़ातून एकदा जिह्यात जातात.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात जर पालकमंत्री जिह्यात तळ ठोकून कोरोना नियंत्रणावर राज्य सरकारी यंत्रणेसोबत समन्वयाचे काम करताना दिसले, आता जर एकाच मंत्र्यांकडे तीन तीन आणि सहा जिल्हे दिले तर ते जिह्याला न्याय कसे देणार हा खरा प्रश्न आहे.

मुंबईत मराठी मतांसाठी जोगवा

 दहीहंडी, गणेशोत्सव नंतर आता सोमवारपासून नवरात्री उत्सवाला सुरूवात झाली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग आणि परळमध्ये मराठी दांडीयाचे आयोजन केले आहे. यापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत भाजपने दहीहंडी उत्सवाचे जोरदार आयोजन केले होते तर दादरमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट पिस्तुल काढून हवेत गोळीबार करण्यापर्यंत गेले होते. शिवडी या मराठी मतदारांचे वर्चस्व असलेल्या भागात भाजपकडून मराठी दांडीयाचे आयोजन केले जाणार असून याची घोषणा नुकतीच भाजपकडून करण्यात आली.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागात भाजपने मायक्रोप्लॅनिंग करत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडून महापालिका ताब्यात घेण्याचा चंग भाजपने बांधला असून, उध्दव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात थेट भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिल्याने हा घाव भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या चांगलाच वर्मी लागला.  याचे पडसाद दोन दिवस उमटल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे एकीकडे भाजप मराठी दांडीयाचे आयोजन करत असताना दुसरीकडे शिवसेनेनेदेखील दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली असून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यात दसऱयाच्या निमित्ताने सोने लुटण्याची नव्हे तर कोण अधिक माणसे जमवतात याचीच स्पर्धा अधिक असणार आहे.

प्रवीण काळे

Related Stories

परिपूर्ण ब्रह्म

Patil_p

बेरोजगारीचे कारण आणि राजकारण!

Patil_p

स्मरणकथा एका नेत्याची!

Patil_p

अडथळ्यांवर स्वार होत ‘कोकण’ची गुणवत्ता पुन्हा ‘टॉप’!

Patil_p

सुट्टीत काय धमाल करणार?

Patil_p

कृषी समस्येला बगल देणारा अर्थसंकल्प

Patil_p