महावीर भवनमध्ये चोरट्यांचा प्रताप : सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद
बेळगाव : लग्न समारंभामध्ये पाहुणे म्हणून आले आणि नवरदेवाच्या आईकडे असलेली प्रेझेंटची पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. सदर पर्समध्ये सोन्यासह अडीच लाखाची रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिंदोळी येथील नंदकिशोर अजरेकर यांच्या मुलाचा विवाह महावीर भवन येथे आयोजित करण्यात आला होता. पाहुणे मंडळीसह सारेजण लग्न समारंभाच्या घाईगडबडीत होते. नवरदेवाची आई रेणुका यांनी आपल्या नातेवाईकांबरोबर फोटो काढण्यासाठी हातामध्ये असलेली पर्स खाली ठेवली. त्यावेळी चोरट्यांसोबत आलेल्या लहान मुलीने ती पर्स घेतली. त्यानंतर त्या मुलीबरोबर आलेली महिला आणि पुरुष तेथून काही वेळातच बाहेर गेले. फोटो काढून झाल्यानंतर रेणुका या पर्स घेण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी पर्स गायब झाली होती. त्यानंतर शोधाशोध करण्यात आली. मात्र पर्स सापडली नाही. त्यामुळे कुणीतरी आपली पर्स लांबविल्याचा संशय सर्वांनाच आला. सर्वांनी शोधाशोध सुरू केली. मात्र सदर पर्स सापडली नाही. त्या पर्समध्ये दीड तोळा सोन्याचा दागिना आणि नातेवाईक व मित्रमंडळींनी दिलेली प्रेजेंट पाकिटे होती. जवळपास अडीच लाखाचा ऐवज लाबविल्याचा संशय आहे. या घटनेनंतर महावीर भवनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एक महिला, पुरुष आणि लहान मुलगी सदर पर्स घेऊन जाताना त्यांची छबी आढळली आहे. या घटनेनंतर टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये जाऊन फिर्याद दाखल करण्यात आली आहे.