विजय मिळाला तरी कॅमेरून स्पर्धेतून गारद; ब्राझीलची लढत आता झुंजार दक्षिण कोरियाशी
वृत्तसंस्था/ कतार
इंज्युरी वेळेतील दुसऱयाच मिनिटाला विन्सेंट अबूबाकरने नेंदविलेल्या गोलमुळे कॅमेरूनने बलाढय़ ब्राझीलला पराभूत केले. या विजयाने कॅमेरूनने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील 20 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपविला. कतारच्या लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला.
लीगमध्ये सर्बिया आणि स्वित्झर्लंडविरूद्धचे सामने जिंकलेल्या ब्राझीलने या सामन्यान बेंचवर असलेल्या आपल्या राखीव खेळाडूंना या सामन्यात स्थान दिले. स्पर्धेतील ‘जी’ गटात ब्राझील व स्वित्झर्लंडचे प्रत्येकी 3 सामन्यांतून समान 6 गुण झाले. मात्र सरस गोलसरासरीवर ब्राझीलने पहिले तर स्वित्झर्लंडला दुसरे स्थान प्राप्त झाले. या गटातून कॅमेरून व सर्बिया यांना बाद व्हावे लागले. आता उप-उपान्त्यपूर्व फेरीत ब्राझीलचा मुकाबला पोर्तुगालला 2-1 असे नमविणाऱया दक्षिण कोरियाशी 5 डिसेंबरला होईल.
कॅमेरूनने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपला शेवटचा विजय 2002 मध्ये सौदी अरेबियाला नमवून नोंदविला होता. कालच्या लढतीत बहुतांश वेळ दबावाखालीच खेळणाऱया कॅमेरूनला शेवटी अबूबाकरच्या हेडरवरील गोलने खळबळजनक विजय प्राप्त करून दिला. त्याने मारलेली हेडर ब्राझीलचा गोलरक्षक एडरसनला भेदून गेली. त्यापूर्वी सामन्यात एक पिवळे कार्ड पडलेल्या अबूबाकरला गोल नोंदविल्यानंतर जर्सी काढल्याने परत एकदा पिवळे कार्ड व त्यामुळे रेड कार्ड मिळाले.
ब्राझीलचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कुठल्याही एका आफ्रिकन देशाविरूद्ध हा पहिला पराभव ठरला. सामन्यात पूर्णपणे वर्चस्व ठेवलेल्या ब्राझीलला मात्र शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. ‘आम्ही पूर्णतः सामन्यावर वर्चस्व ठेवले, मात्र गोल करण्यात आम्ही असमर्थ ठरलो,’ असे ब्राझीलचा खेळाडू इदेर मिलितांव म्हणाला. आम्हाला गोल करण्याच्या कित्येक संधी होत्या. मात्र शेवटच्या क्षणी झालेली केवळ एक चूक आमच्या पराभवास कारणीभूत ठरली, असे मिलितांव म्हणाला.
सामन्याच्या 14 व्या मिनिटाला गाब्रियल मार्तिनेलीने पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱया ब्राझीलला आघाडीवर नेले असते. या सामन्यात सुंदर खेळ करणाऱया गाब्रियलने प्रेडने दिलेल्या क्रॉसवर जबरदस्त हेडर मारला होता. पण तेवढेच अप्रतिम गोलरक्षण कॅमेरूनच्या डेवीस इपासीने करून संघावर होणारा संभाव्य गोल वाचविला. पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेत एकमेव धोकादायक चाल वगळता कॅमेरूनला विशेष प्रभाव पाडता आला नाही. यावेळी निकोलस मौन गामालेऊच्या क्रॉसवरील ब्रायन बिवूमोचा हेडर गोलमध्ये जाताना ब्राझीलचा गोलरक्षक एडरसनने एका हाताने डाईव्ह मारत अडविला.
दुसऱया सत्रात ब्राझीलने गोलांच्या प्रतीक्षेत तीन बदल केले. यावेळी त्यांनी आलेक्स तेलीस, रॉड्रिगो व पेड यांच्या स्थानावर मार्क्विनो, एव्हर्टन रिबेरो व ब्रुनो गुमारीयस यांना संधी दिली. या बदलानंतर ब्राझीलचा खेळ आणखी बहरला. त्यांनी कित्येक आक्रमणेही केली. यामुळे कॅमेरूनचा गोलरक्षक इपासी आणि त्यांच्या बचावफळीवर सतत दबाव दिसला.
लढतीच्या 56 व्या मिनिटाला प्रथम मार्टिनेलीचा ‘स्नॅप शॉट’ प्रतिस्पर्धी गोलरक्षकाने पंच करून बाहेर टाकला. त्यानंतर इदेर मिलितांवचा कॉर्नरवरील फटका गोलमध्ये जात असताना गोलरक्षकाने परत एकदा अडवून संघावर होणारा गोल वाचविला. त्याच्यानंतर परत एकदा गोलरक्षकाने अँथनीने हाणलेला फटका आपल्या उजव्या बाजूने झेपावत बाहेर टाकला. ब्राझीलचे प्रशिक्षक एडीनोर यांनी त्यानंतर लीगमध्ये निर्भेळ यश मिळविण्यासाठी आणखी दोन बदल करताना पेदू आणि राफिन्हो यांना संधी दिली, मात्र ब्राझीलला गोल मारता आला नाही. शेवटी इंज्युरी वेळेत अबूबाकरने ऐतिहासिक गोल करून ब्राझीलचे लीगमध्ये 9 गुण मिळविण्याचे मनसुबे उधळले.
ब्राझीलने सलग अकराव्या वेळी गटात अग्रस्थान मिळविले. 1998 मध्ये फ्रान्समधील स्पर्धेत ब्राझीलला नॉर्वेकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर गट साखळी फेरीत त्यांनी सलग 17 विजय नोंदवले होते. ही मालिका येथील पराभवाने खंडित झाली. गेल्या 29 गट साखळीतील सामन्यांत त्यांनी फक्त एक पराभव स्वीकारला होता.