वृत्तसंस्था/ मॅलेगा (स्पेन)
डेविस चषक टेनिस स्पर्धेत कॅनडाने शनिवारी इटलीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता जेतेपदासाठी कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होईल.
कॅनडा आणि इटली यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली. या लढतीत कॅनडाने इटलीवर 2-1 अशी मात केली. कॅनडाच्या 22 वर्षीय ऍलिसिमेने इटलीच्या मुसेटीचा 6-3, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला. तत्पुर्वी पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या सोनेगोने कॅनडाच्या शेपोव्हॅलोवर 7-6(7-4), 6-7(5-7), 6-4 असा विजय मिळवून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. ऍलिसिमेच्या विजयाने कॅनडाने त्यानंतर बरोबरी साधली. तिसऱया निर्णायक दुहेरीच्या सामन्यात ऍलिसिमे आणि पोस्पीसिल या कॅनडाच्या जोडीने इटलीच्या बेरेटेनी आणि फॉगनेनी यांचा 7-6(7-2), 7-5 असा पराभव करत इटलीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. 2019 साली या स्पर्धेत अंतिम लढतीत स्पेनने कॅनडाचा पराभव केला होता. दरम्यान 2022 च्या डेविस चषक स्पर्धेत विद्यमान विजेत्या रशियाच्या जागी कॅनडाला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. युक्रेन बरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाला या स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. 1998 नंतर इटली संघाला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. 1976 साली इटलीने डेविस चषक स्पर्धा जिंकली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाने क्रोएशियाचा पराभव करत 2003 नंतर या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.