आमदार विजय सरदेसाई यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
सांकवाळ येथे सुप्रसिद्ध झुवारी ऍग्रो कॅमिकल या कंपनीने आपली जमीन, आपला उद्योग पॅरादीप फॉस्फेट लि. या कंपनीला विकल्यानंतर आता बंगळुरच्या एका कंपनीने तेथील जागेत जवळपास 12 हजार लोकांना राहण्याची व्यवस्था करणारे प्लॅट उभारण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाची मान्यता त्वरित काढून घ्या, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी नगरनियोजनमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार विजय सरदेसाई यांनी, मंगळवारी सायंकाळी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत झुवारीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीत मोठय़ा प्रमाणात प्लॅट उभारण्यात येण्याच्या या निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
दिलेली मान्यता काढून घ्यावा
सरदेसाई यांनी नगरनियोजनमंत्र्यांना पत्र पाठविले असून येत्या दि. 9 जून रोजी होणाऱया नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत या अगोदर मुरगांव पीडिएने या प्रकल्पाला दिलेली मान्यता त्वरित काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विजय सरदेसाई यांनी सांगितले की, सांकवाळ सर्वे क्र. 197/1 आणि 198/1 यामध्ये 1 लाख 28 हजार 975 चौ.मी. जमीन असून कैक वर्षांपूर्वी गोवा सरकारने साकंवाळ कोमुनिदादच्या सहकार्याने झुवारी ऍग्रो कॅमिकल्स प्रा. लि. या कंपनीला उद्योग स्थापण्यासाठी दिली होती. सदर जमीन उद्योग प्रकल्पासाठी राखीव आहे. आता कैक वर्षानंतर झुवारीने आपला कारखान्याच्या जागेसकट पॅरादीप कंपनीला विकला आणि त्याशिवाय कंपनीच्या बाजूला असलेली जागा ही कंपनीने एक्सचेंज ऑफर म्हणून जी दिली होती त्यानंतर आता झुवारीच्या जागेमध्ये सुमारे 1100 प्लॅट तयार केले जात आहेत.
या अगोदरच नगरनियोजनमंत्र्यांनी मुरगांवचा ओडीपी स्थगित केलेला आहे आणि झुवारीच्या जागेमध्ये 2 लाख 820 चौ.मी. क्षेत्रफळातील बांधकाम होणार आहे. त्यातून सध्याच्या सांकवाळ गावामध्ये लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या आणखी वाढणार आहे. यातून गोव्याची तथा सांकवाळची डॅमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न आहे. मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला दिलेली मान्यता त्वरित काढून घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.