नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी पालिका बैठकीत दिलेली माहिती, दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास वीज-पाणी जोडणी तोडणार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण पालिकेची अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे आणि ‘स्पेस फी’च्या रूपात 95 लाख रु. इतकी थकबाकी असून ही थकबाकी हप्त्यींनी भरण्याची सवलत संबंधितांना देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत जर ही रक्कम पालिकेच्या खजिन्यात जमा केली नाही, तर या सर्व दुकानांची वीजजोडणी व पाण्याची जोडणी तोडण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी दिला आहे.
काणकोण पालिका मंडळाची बैठक गुरुवारी आपत्कालीन आसरास्थळी घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक हेमंत ना. गावकर, नगरसेविका नीतू देसाई, सुप्रिया देसाई वगळता अन्य सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी मधू नार्वेकर, पालिका अभियंता दिलखुश गावकर, पालिका निरीक्षक येसो देसाई, पर्यवेक्षक कनय देसाई, नम्रता देसाई, भारती मडगावकर यांची उपस्थिती होती. घरपट्टी व दुकानांचे भाडे मिळून 40 लाख रु. तर पालिकेच्या ‘स्पेस फी’च्या रूपाने 55 लाख रु. इतकी थकबाकी आहे, असे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
पर्यटन व्यवसायांतून 1 कोटीचा महसूल
यंदाच्या पर्यटन मोसमात पालिकेकडे आतापर्यंत आलेल्या फायलींमधून 101 फायली मोकळय़ा करण्यात आल्या आहेत. त्यातून पालिकेला 1 कोटी रु. इतका महसूल मिळाला आहे. ज्या बाकी आहेत त्यांनाही लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. मागच्या वर्षी ही रक्कम 67 लाख रु. इतकी होती, अशी माहिती नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली.
पालिका क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न
केंद्र सरकारकडून या पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या वर्षी उत्कृष्ट पालिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तो मान तसाच कायम ठेवण्याच्या दृष्टीने पालिका प्रयत्नशील आहे. सध्या प्रत्येक वॉर्डात जाऊन कचरा गोळा करण्याचे काम पालिकेचे कामगार करत आहेत. तरी देखील रस्त्याच्या बाजूला काही जण कचरा टाकण्याचे काम करताना दिसतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आठवडय़ातून एकदा संध्याकाळच्या सत्रात प्रत्येक वॉर्डात कचरा गोळा करण्यासाठी कामगारांना पाठविण्यात येणार असून त्यावर पालिकेचे पर्यवेक्षक देखरेख ठेवणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
पालिकेच्या मालकीच्या ज्या इमारती आहेत त्या दुरुस्त करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्या इमारतांमध्ये राहणाऱया लोकांची आणि व्यावसायिकांची सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या इमारती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने विचार चालू असल्याची माहिती यावेळी नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी दिली.
कचरा प्रकल्पावरून आरोप
दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झालेला आहे. प्रकल्प बंद असताना ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले आहे. या कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा कुजल्यामुळे सर्वत्र किडे पडले आहेत, असा आरोप नगरसेवक धीरज ना. गावकर आणि शुभम कोमरपंत यांनी केला आणि संयुक्त तपासणी करण्याची मागणी केली. मात्र या आरोपाचे खंडन करताना या प्रकल्पाला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘ना हरकत दाखला’ दिलेला असून पालिका अभियंत्यांनी पाहणी केलेली आहे तसेच गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून दाखला मिळालेला आहे, याकडे नगराध्यक्षांनी लक्ष वेधले.
देखभालीसाठी पाच वर्षांपर्यंत ठेकेदाराला दरमहा 1 लाख रु. पालिकेकडून द्यावे लागतील. दरदिवशी पर्यटन हगामात 10 टन इतका कचरा गोळा होत असतो. आपण या प्रकल्पाला आठवडय़ातून एकदा भेट देत असतो. नगरसेवक धीरज गावकर यांनी विनाकारण आरोप करू नयेत, असा सल्ला नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी दिला.
नगरसेवकांकडून विविध मागण्या
राजबाग-तारीर येथील दि ललित रिसॉर्टच्या समोर रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱया टॅक्सीचालकांची हॉटेल व्यवस्थापनाकडून विनाकारण सतावणूक केली जाते, असा दावा करून नगरसेवक गंधेश मडगावकर यांनी हॉटेलसमोरची जागा नेमकी कोणाची यासंबंधी पालिकेने चौकशी करावी अशी मागणी केली. तर, पालिकेला विकासकामांसाठी जो निधी मंजूर झालेला आहे त्याचा समान प्रमाणात विनियोग प्रत्येक वॉर्डात करावा, पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करावी अशा मागण्या धीरज गावकर यांनी केल्या.
आसरास्थळातील सभागृहाचे भाडे निश्चित
प्रादेशिक आराखडा परत एकदा जनतेसाठी खुला ठेवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. जलस्रोत खात्याने आपत्कालीन व्यवस्थापनाखाली नगर्से येथे जी आसरास्थळाची इमारत उभारली आहे त्याचा ताबा पालिकेकडे दिलेला आहे. या इमारतीच्या देखभालीसाठी वर्षाला 5 लाख रु. इतका महसूल मिळणार आहे. तो निधी अपुरा असून या इमारतीमधील सभागृह भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम सोडल्यास या सभागृहाचे 10 हजार रु. इतके भाडे ठेवण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षांनी मांडला आणि पालिका मंडळाने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
याशिवाय पालिका उद्यानाचे सौंदर्यीकरण, रस्त्याच्या बाजूचे बेकायदेशीर फलक हटविणे, वॉर्ड क्र. 12 मधील नाल्याची सफाई, रस्त्याच्या बाजूला बसणाऱया मासेविक्रेत्या महिला व भाजीविक्रेत्या आणि त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी, पाटणे येथे पार्किंगसाठीच्या जागेचे भूसंपादन, नवीन मासळी मार्केट प्रकल्पाची उभारणीं, पाळोळे येथील पथदीपांसाठी अतिरिक्त वीजवाहिनी, रस्त्याच्या बाजूला शहाळय़ांची विक्री करणाऱयांकडून होणारा गलिच्छपणा तसेच कर्मचाऱयांचा वैद्यकीय भत्ता, गणवेष भत्ता, ध्वजारोहण भत्ता, ,धुलाई भत्ता याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष लक्ष्मण पागी, नगरसेवक सायमन रिबेलो, सारा देसाई, नारसिस्को फर्नांडिस, अमिता पागी यांनीही भाग घेतला. पालिका कर्मचारी संतोष कोमरपंत यांनी इतिवृत्ताचे वाचन केले.