‘पंजाब लोक काँग्रेस’चे होणार भाजपमध्ये विलिनीकरण
चंदिगड / वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग 19 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींच्या भेटीनंतर त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे. कॅप्टन यांच्यासह राज्यातील त्यांचे निकटवर्तीय 5-6 माजी मंत्रीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासोबतच अमरिंदर यांचा पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’ही भाजपमध्ये विलीन होणार आहे. कॅप्टन यांच्या प्रवेशानंतर भाजप पंजाबमध्ये पक्षाची पुनर्रचना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांचा कार्यकाळ संपणार असल्याने पंजाब लोक काँग्रेसचे भाजपमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर पक्ष पंजाबमधील महत्त्वाच्या जबाबदाऱया कॅप्टन आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडे सोपवू शकतो. पंजाबमध्ये भाजपकडे सध्या फक्त दोन जागा आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याबाबतच्या चर्चेला वेग आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत सुमारे पाऊण तास बैठक करत राजकीय वाटचालीबाबत चर्चा केली होती. बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसच्या (पीएलसी) भाजपमध्ये विलिनीकरणाच्या प्रश्नाला नकार देत याला केवळ अटकळ असल्याचे म्हटले होते. तत्पूर्वी अमरिंदर सिंग यांनी 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर पंजाबच्या विविध मुद्दय़ांवर चर्चा केल्यानंतर राज्य आणि देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला, जो आपल्या दोघांसाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट आहे आणि राहील, असे ट्विट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले होते.