नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले जयवीर शेरगिल यांना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले शेरगिल यांची भाजपने राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग, सुनील जाखड या पंजाबमधील दोन नेत्यांची आणि उत्तर प्रदेशमधील स्वतंत्रदेव सिंग यांची राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी पक्षातील नव्या संघटनात्मक नियुक्त्यांची माहिती शुक्रवारी दिली. या नियुक्त्यांनुसार सदस्य म्हणून तिघांची वर्णी लावण्यात आली आहे. तर उत्तराखंडमधील मदन कौशिक, छत्तीसगडमधील विष्णुदेव साय आणि पंजाबमधील एस. राणा गुरमीत सिंह लोढी, मनोरंजन कालिया, अमनजोत कौर रामूवालिया अशा एकूण पाच जणांची विशेष आमंत्रित राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.