Tarun Bharat

युवा हृदयांची काळजी!

Advertisements

महाराष्ट्रात 30 ते 40 वयोगटातील पुरुषांमध्ये आणि 40 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये हृदयविकाराचे अधिक प्रमाण आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकारामुळे होणारे अकाली मृत्यू थांबवण्याच्या इराद्याने गेले वर्षभर महाराष्ट्र सरकार स्टेमी महाराष्ट्र योजना राबवत आहे. ही स्तुत्य योजना आता केवळ बारा जिह्यांपूरती न राहता संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. यावषीच्या डिसेंबर अखेर राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वत्र रुग्णांचे निदान आणि उपचार गतीने सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात बारा जिह्यांमध्ये 145 आरोग्य केंद्राद्वारे दोन लाख 56 हजार 9992 लोकांनी इसीजी आणि सहा हजार 144 लोकांनी स्टेमीसाठी उपचार घेतले होते. यामध्ये हृदयविकाराचे निदान आणि उपचारांमध्ये थ्रोंबोलिसीस, एन्जोप्लास्टी आणि बायपास उपचारांचा समावेश होता. या सुविधेद्वारे वाढत्या अकाली मृत्यू कोरोनरी समस्यांमुळे होणारे अकाली मृत्यू 25 टक्के कमी करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी केशरी, पिवळय़ा रेशन कार्डसह महात्मा फुले योजनेतील दवाखान्यांमध्ये शासकीय योजनेतून उपचार करण्याची सोय झाली आहे. ही केवळ महाराष्ट्राची समस्या नाही. संपूर्ण भारतात 2021 मध्ये 28 हजार पेक्षा अधिक हृदयाशी संबंधित मृत्यूंपैकी जवळपास 20 हजार हे 30 ते 60 वयोगटातील होते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकणात सुपर स्पेशालिटी हृदय उपचार सेवा देणारे मिरजेतील डॉ. रियाज मुजावर यांच्या मते, गत वर्षभरात अगदी सोळा वर्षे वयाची मुलेसुद्धा हृदय रुग्ण बनल्याचे अनेकदा दिसून आले. अचानक हृदयविकाराचे एकापाठोपाठ एक झटके येऊन रुग्ण दगावल्याच्या घटना सध्या सर्व भागात घडताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या घटनांची दहशतच लोकांच्या मनात बसली आहे. घरचा कर्ता पुरुष दगावण्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्याने समाजात त्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. तरुण वयात हृदयविकाराची अनेक कारणे यापूर्वीही तज्ञांनी सांगितली आहेत. सेलिब्रिटी गायक केके, स्टँड अप कॉमेडियन राजीव श्रीवास्तव यांच्या अकाली मृत्यूनंतर त्याबद्दल बरीच चर्चा घडली. मात्र तरीही भारतातील तरुण वयातील अनेक रुग्णांना आपल्याला अशा प्रकारचा मृत्यू येऊ शकतो याची जाणीवही नाही, हे दुर्दैव. अनियंत्रित मधुमेह, रक्तातील साखर धोक्मयाच्या पातळीपर्यंत पोहोचणे, उच्च रक्तदाब, धूम्रपान, कुटुंबात पूर्वीपासून हृदयविकाराचा इतिहास, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा या काही कारणांबरोबरच अलीकडच्या काळात पोस्ट कोविड कारणांमुळे श्वासोच्छ्वासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे, जळजळ आणि हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे अशा समस्यांमधून हृदयविकाराचे गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले गेले. अर्थातच कोविड वरील उपचाराच्या काळात सरकारला आपल्या वैद्यकीय सेवेची बलस्थाने आणि कमतरता अधिक प्रकर्षाने लक्षात आली. राज्य आणि केंद्र सरकारने त्यानुसार आपल्या धोरणात बदल करायचे ठरवले. गतवषीपर्यंत राज्यात उद्धव ठाकरे सरकारने या दृष्टीने चांगली वाटचाल करत राज्यातील प्रत्येक जिह्यात त्यातल्या व सुरू करण्यापर्यंतचा विचार करून वाटचाल सुरू केली होती. गेल्या काही वर्षात माता बाल संगोपन कार्यक्रमात महाराष्ट्राने अशीच गती घेतली आहे. सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारने या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकत संपूर्ण राज्यात ही सुविधा वाढवण्याबरोबरच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करून महाराष्ट्रातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा निर्धार केला आहे. आशा आणि आरोग्य सेवकांनाही चांगल्या सुविधा देण्याचा सरकारने मानस बोलून दाखवला आहे. केवळ समुदाय वैद्यकीय अधिकाऱयांच्या बाबतीत मात्र सरकारने आपली भूमिका अद्याप बदललेली नाही. परिणामी ग्रामीण भागात कॅन्सर, क्षयरोग आणि सुरक्षित बाळंतपणाच्या समस्या आव्हान बनून उभ्या आहेत. त्यातच युवा हृदय रुग्णांची वाढती संख्या हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात चिंतेचा विषय बनला आहे. तातडीने निदान आणि उपचार ही यातील प्रमुख फायदे आहेत. त्यासाठी डॉक्टर योग्य कार्यात गुंतला असणे आणि कागदपत्रांच्या जंजाळात त्यांची सुटका गरजेची बनली आहे. आरोग्याच्या या समस्या जीवन पद्धतीत झालेल्या बदलामुळे आणि 1991 नंतर आलेल्या जागतिकीकरणाच्या आव्हानातून पुढे आल्या आहेत. हे ध्यानात घेऊन, 1990 पूर्वी सर्वसामान्य भारतीय जसे जगत होते तसे जगण्याची गरज निर्माण झाली आहे आणि जीवन पध्दतीतील बदलाविषयी जागरूकताही उपचारा इतकीच महत्त्वाची बनली आहे. जंक फूड टाळून भारतीय पद्धतीचा चौरस आहार घेणे हे केवळ व्याधीग्रस्त व्यक्तींसाठीच नव्हे तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक बनले आहे. दिवसातील किमान 45 मिनिटे चालणे, धावणे, सायकल चालवणे, तालमीत व्यायाम करणे किंवा पोहणे, शेंगदाणे, कच्च्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, किंवा प्रथिनेयुक्त अंडी, मांसाहार, डाळी आणि भात, भाकरी, दूध किंवा दही, ताक असा खूप रंगांनी भरलेल्या घरच्या भोजनाचा आस्वाद आलटून, पालटून घेणे गरजेचे बनले आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे हे सगळे बदलून डबाबंद प्रिझर्वेटिव खाद्य खाणे, निकस पदार्थांनी पोट भरणे, पाणीही प्यायचा आळस अशा अनेक बाबी डॉक्टरांच्या अभ्यास आणि संशोधनातून पुढे येत आहेत. याकडे दुर्लक्ष करून आपण औषध उपचाराने सुदृढ राहू, असा जे विचार करत आहेत त्यांचे जीवन धोक्मयात येत आहे. असे जीवन धोक्मयात आलेल्यांसाठी योजना आखणे ही सरकारची प्राथमिकता असली तरी सुद्धा जीवनशैलीत बदल केला तर सरकारवर पडणारा ताण कमी होईल आणि व्यक्तीचे जीवनमानही उंचावेल. आजच्या आव्हानांना भारतीय जीवनशैली हे एक खूप महत्त्वाचे उत्तर आहे. गरजेचेही बनलेले आहे. युवा हृदय जपायचे तर आपली जुनीपुराणी वाटणारी पण उपयुक्त जीवनशैलीही जपली पाहिजे. ती पुन्हा नव्या आणि जुन्या पिढीच्या दैनंदिन जीवनात उतरली पाहिजे. तरच या समस्यांवर मात करता येईल. अन्यथा यातून सुटका झाली तर दुसरे कुठले तरी संकट आ वासून उभेच राहणार आहे.

Related Stories

कृतज्ञतेने जगायला शिकायला हवे…

Patil_p

रोप उपटून मुळांची तपासणी!

Patil_p

राजकारणाच्या गटारगंगेचे शुद्धीकरण कधी?

Amit Kulkarni

मोसमी पावसाचा बिगूल

Patil_p

आज अर्थसंकल्पात काय?

Patil_p

शेतकऱयांच्या आर्थिक स्वातंत्र्याची नांदी

Patil_p
error: Content is protected !!