मोंगला येथे पोहोचले पहिले जहाज ः ईशान्येतील राज्यांना होणार लाभ
वृत्तसंस्था/ मोंगला
बांगलादेशी बंदरांचा वापर करत भारताने ईशान्येतील राज्यांकरता मालवाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. भारताने मंगळवारी दोन प्रमुख बंदरांचा वापर करत ईशान्येतील राज्यांमध्ये सामग्रीच्या ट्रान्स-शिपमेंटसाठी ट्रायल रन सुरू केली आहे. द्विपक्षीय कराराच्या अंतर्गत या सामग्रीला रस्तेमार्गाद्वारे ईशान्येतील राज्यांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. बांगलादेशच्या मोंगला बंदरावर मालवाहतूक करणारे जहाज सोमवारी पोहोचले होते.
ही ट्रायल रन प्रारंभी जुलैमध्ये पार पडणार होती. परंतु बांगलादेशी अधिकाऱयांना सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाल्याने ऑगस्टमध्ये ही ट्रायल रन होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दौऱयावर येणार असून त्यापूर्वीच या योजनेला चालना मिळाली आहे.
परीक्षणादाखल कोलकाता बंदरावरून एमव्ही रिशद रेहान बांगलादेशातील मोंगला बंदरावर पोहोचले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या द्विपक्षीय करारानुसार हे जहाज ‘ट्रान्सशिपमेंट’ अंतर्गत दाखल झाले आहे. याच्या अंतर्गत भारतातून सामग्री आणणे आणि दुसऱया ठिकाणी नेण्यासाठी बांगलादेशातील चितगाव आणि मोंगला बंदराचा वापर केला जाणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
आमच्या बंदरावर सामग्रीसह पोहोचलेले एमव्ही रिशद रेहान हे पहिले भारतीय जहाज आहे. ही सामग्री भारताच्या ईशान्येतील राज्यांमध्ये रस्तेमार्गाने पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती मोंगला बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष रियर ऍडमिरल मोहम्मद मुसा यांनी दिली आहे. जहाजावर 16,380 टन वजनाचे लोखंडी पाइप आणि 8.5 टन ‘फ्रीफोम’ आहे. ढाका येथील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱयांनी या जहाजाचे मोंगला बंदरात स्वागत केले आहे.
यापूर्वी मागील महिन्यात चितगाव बंदरावर भारतीय सामग्रीने भरलेले जहाज पोहोचले होते. यातील सामग्री त्रिपुरा आणि आसाममध्ये पोहोचविण्यात आली होती. सीमाशुल्क अधिकारी आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणांना भारतीय सीमेपर्यंत कंटेनर्स सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन्ही देशांनी 2015 मध्ये प्रारंभिक ‘ट्रान्सशिपमेंट’ करार केला होता. ज्यानंतर 2018 मध्ये एक विस्तृत करार झाला आणि दोन्ही देशांच्या अधिकाऱयांनी याच्या अंमलबजावणीसाठी एक संचालन प्रक्रिया तयार केली होती, अशी माहिती बांगलादेशच्या प्राधिकरणाकडून देण्यात आली.