येत्या 18 पासून कार्निव्हल, 8 मार्चपासून शिमगोत्सव : मांडवी नदी आणि आकाशातूही यंदा कार्निव्हल मिरवणूक
प्रतिनिधी /पणजी
देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि 18 व्या शतकापासून आयोजित करण्यात येणारा प्रसिद्ध कार्निव्हल महोत्सव यंदा दि. 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या विविध भागात साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्या असलेला ’किंग मोमो’ म्हणून यंदा मडगाव येथील व्यावसायिक रसेल डिसोझा यांची निवड करण्यात आली आहे. हाच किंग मोमो तमाम गोमंतकीयांना ’खा प्या आणि मजा करा’ असा अनोखा संदेश देत असतो. कार्निव्हलच्या संपूर्ण कालावधित त्याचेच गोव्यावर राज्य असते असे मानण्यात येते. दरम्यान, यंदा या सोहळ्याचा पडदा यंदा दि. 16 रोजी पर्वरीतून उघडला जाणार असून त्यानंतर दि. 18 रोजी पणजीत कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येणार आहे. मडगाव, वास्को, म्हापसा आणि मोरजी या भागातही कार्निव्हल मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
मांडवी नदी आणि हेलिकॉप्टरद्वारे आकाशातूनही मिरवणूक
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या तारखांची घोषणा केली. यंदाचे कार्निव्हल चित्ररथ केवळ जमिनीपुरतेच मर्यादित न राहता मांडवी नदीतून आणि हॅलिकॉप्टरद्वारे आकाशातूनही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यावरून यंदाचा कार्निव्हल अतिशय अनोखा आणि देखणा असेल, असे त्यांनी सांगितले.
कार्निव्हल ही ख्रिश्चन परंपरा उपवास आणि पश्चातापाचा हंगाम सुरू होण्याआधी आनंददायी मेजवानी, नाच-गाणे आणि मद्यपान करण्याशी संबंधित आहे. कार्निव्हल परेडमध्ये पारंपारिक, संस्थात्मक, कौटुंबिक, क्लाउन जोकर आदी श्रेणीतील फ्लोटस्सह मिरवणुकीत सहभागी होईल. त्यात स्थानिक गावे, येथील पारंपारिक व्यावसाय आणि सांस्कृतिक गट यांचा त्यात समावेश असेल. त्याशिवाय सासष्टीतील ’खेळ तियात्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पथनाट्याचाही त्यात समावेश असेल.
8 मार्चपासून शिमगोत्सव
पर्यटनमंत्र्यांनी राज्यात सरकारी पातळीवर साजरा करण्यात येणाऱ्या शिमगोत्सवाच्याही तारखांची घोषणा केली. त्यानुसार 8 ते 21 मार्च दरम्यान राज्यात शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिमगोत्सव किंवा शिमगा म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव म्हणजे वसंतोत्सव असतो. हिंदूंसाठी सर्वात मोठा असलेल्या या सणाचा आनंद पर्यटकांनाही घेता यावा या उद्देशाने दरवर्षी पाच दिवसांचा हा रंगांचा नेत्रदीपक उत्सव राज्याच्या विविध शहरांमध्ये चित्ररथ आणि पारंपारिक नृत्य, धार्मिक देखावे, अशा वैशिष्ट्यांसह मिरवणुका काढून साजरा करण्यात येतो. उत्कृष्ट चित्ररथ डेकोरेटर्स आणि मिरवणुकीतील कलाकारांना पारितोषिके दिली जातात. या वर्षी, रंगीत उत्सव 8 मार्चपासून सुरू होऊन 21 मार्चपर्यंत चालणार आहे. यंदा शिमग्याच्या मिरवणुका पणजीसह पर्वरी, म्हापसा, पेडणे, मडगाव, फोंडा, वास्को, डिचोली, वाळपई, सांखळी, कुडचडे, सांगे, केपे आणि काणकोण येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन खात्याची सज्जता
वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही या शिमगोत्सवासाठी जगभरातील पर्यटकांचे स्वागत करण्याच्या दृष्टीने पर्यटन खाते सज्ज झाले आहे. नवीन हेलिपॅड सुरू झाल्यामुळे उच्चवर्गीय पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतील. त्याशिवाय पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खात्याने 24 तास अखंडित चालणारी हेल्पलाइनही सुरू केली आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी किंवा हवी असलेल्या माहितीसाठी पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. गोवा हे एक जबाबदार आणि शाश्वत पर्यटन स्थळ बनविण्याच्या दृष्टीने सरकारचे सर्व प्रकारे प्रयत्न आहेत, असे खंवटे यांनी सांगितले.