वाहक गणेश भोसलेंच्या डोक्याला दुखापत : उपचारासाठी रूग्णालयात दाखल
प्रतिनिधी/ सातारा
सातारा आगारात दुपारी बाराच्या सुमारास पुणे-देवरूख आगाराची बस सातारा डेपोतून बाहेर काढताना वाहक सूचना देत होता. यावेळी पिंपरी-चिंचवड आगाराची बस आली. या दोन्ही बसच्यामध्ये वाहक सापडले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पुणे-देवरूख एसटीबस (क्रं. एमएच 09 पीएम 9649) ही प्लॅटफॉर्मला नोंदणी करून परतीच्या मार्गाने जाण्यासाठी चालक कारंडे याला वाहक गणेश राजाराम भोसले (वय 28, रा. पारगाव खंडाळा ता. खंडाळा) हे मार्गदर्शन करत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड एसटीबस (क्रं. एमएच 14 बीटी 3392) पाठीमागून आली. ही बाब चालकाला सांगण्यासाठी बसच्या पाठीमागून जात असताना या दोन्ही बसच्यामध्ये वाहक गणेश भोसले सापडले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना दोन्ही बसच्यामधून बाहेर पडता येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा केला. ही बाब आगारातील इतर कर्मचारी, प्रवाशांच्या लक्षात आली. सर्वजण तत्काळ त्यांच्या मदतीला धावून गेले. यावेळी दोन्ही एसटीबसमधून त्यांना बाहेर काढण्यात आले. डोक्याला इजा झाल्याने तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सातारा आगाराकडून सांगण्यात आले आहे.