Tarun Bharat

रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्गासह विकासकामे करा

Advertisements

पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

प्रतिनिधी /बेळगाव

रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, चोर्ला महामार्ग, कळसा-भांडुरा आणि बळ्ळारी नाला यांचा आढावा घेत पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या, ज्याचा आराखडा तयार नाही त्याचा आराखडा तयार करा, अर्धवट कामे पूर्ण करा, ज्या मंजुरी घ्यायच्या आहेत त्या मंजुरी मिळवा, एकमेकांशी संवाद साधून ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी पाऊल उचला, अशी सक्त ताकीद पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. हलगा-मच्छे बायपास रस्ता अजून का झाला नाही? कोणत्या अडचणी आहेत? अशी विचारणा केली तर बेळगाव-खानापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4-ए कामदेखील अर्धवट आहे. ते काम पूर्ण करा, अशी सक्त सूचना त्यांनी केली. हलगा-मच्छे बायपाससंदर्भात कंत्राटदाराला धारेवर धरण्यात आले. तुमच्या वेळकाढूपणामुळे हा रस्ता अर्धवट राहिला. त्यावेळेत शेतकरी न्यायालयात गेले व स्थगिती मिळविली, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावर कंत्राटदाराने आम्ही युद्धपातळीवर काम केले. मात्र पावसामुळे काम थांबवावे लागले, असे सांगितले. न्यायालयामध्ये स्थगिती आहे. त्यावर पुढील न्यायालयीन कारवाई काय केला? असा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना विचारण्यात आला. मात्र त्यांच्याकडे याचे काहीच उत्तर नव्हते. बेळगाव-खानापूर रोडवरील हत्तरगुंजी आणि झाडशहापूरजवळ अजूनही काम अर्धवट आहे. ते काम कधी पूर्ण करणार? यावर एक महिन्यामध्ये काम पूर्ण करू, असे कंत्राटदाराने आश्वासन दिले आहे.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत घेतला आढावा

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयामध्ये काही शेतकरी गेले आहेत. त्यामुळे हे काम प्रलंबित होते. मात्र आता स्थगिती उठली आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. लवकरच हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी रेल्वे अधिकारी व कंत्राटदारांनी संयुक्तपणे तातडीने कार्यवाही करावी, असे सांगितले.

बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था

बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. हा रस्ता खराब झाल्यामुळे अपघात घडत आहेत. अनेक वाहनांचे टायर फुटत आहेत. आमदार अनिल बेनके यांनी, माझ्या स्वतःच्या वाहनाचे टायर फुटले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही, असा आरोपदेखील केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करा, अशी सूचना त्यांनी केली. या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. ते काम देखील तातडीने सुरू करा. जागा कब्जात घेऊन काम सुरू करा. तत्पूर्वी सध्या असलेल्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

सांबरा विमानतळाला लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जा

सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी आणखी 100 एकर जमीन आवश्यक आहे, असे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री कारजोळ यांनी तुम्हाला आवश्यक आहे ती जमीन दिली जाईल. मात्र तातडीने काम सुरू करा, असे सांगितले. यावेळी मौर्य यांनी माविनकट्टी-बाळेकुंद्रीच्या रस्त्याबाबत काही सूचना केल्या. या परिसरातील मटण, चिकनची दुकाने बंद करणे गरजेचे आहे. कारण नियमानुसार विमानतळाच्या परिसरात अशा दुकानांवर बंदी असते. मात्र सांबऱयामध्ये अजूनही ही दुकाने सुरू असून त्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

चोर्ला रस्ता काँक्रिटचा बनवा

बेळगाव-चोर्ला रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. त्या रस्त्याबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला असता या रस्त्यावर अनेक झाडे येत आहेत. 200 हून अधिक झाडे असून ती झाडे हटविणे महत्त्वाचे आहे. झाडे हटविल्यानंतरच रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करणे शक्मय आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी, योग्य पाऊल उचला व तातडीने हा रस्ता काँक्रिटीकरण करा, असे सांगितले.

बागलकोट-कुडची रेल्वेमार्ग पूर्ण करा

बागलकोट-कुडची रेल्वेमार्गासाठी जमिनी कब्जात घेतल्या आहेत. मात्र अजूनही काम पूर्ण होताना दिसत नाही. अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला खासदार मंगला अंगडी, खासदार इराण्णा कडाडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं.चे सीईओ दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बेळगावच्या प्रवेशद्वारांवरील रस्त्यांची दुरवस्था

कोल्हापूरकडून बेळगाव शहरात प्रवेश करताना खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. वास्तविक या रस्त्याचे दुपदरीकरण करावे, याचबरोबर रस्ता मजबूत करावा, अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी केली. हिंडाल्कोजवळून आल्यानंतर रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. वास्तविक या रस्त्याच्या चारपदरीकरणाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर धारवाडकडून शहरात प्रवेश करताना गांधीनगरजवळ अत्यंत कोंडी निर्माण होत आहे. हा रस्ताही पूर्ण खराब झाला आहे. त्याचे दुपदरीकरण करा, अशी मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांना तातडीने याबाबत सूचना केली आहे.

Related Stories

बेकिनकेरेत 37 पैकी 7 उमेदवारांची माघार

Patil_p

वसती बसेस बंद झाल्याने दक्षिण भागातील ग्रामस्थांचे हाल

Amit Kulkarni

सिव्हिलच्या सुरक्षेची जबाबदारी आता पोलिसांवर

Amit Kulkarni

जून महिन्यात कमी, जुलैमध्ये दुप्पट पाऊस

Amit Kulkarni

गरिबांसाठी कणी तर तस्करांसाठी लोणी!

Amit Kulkarni

साठे प्रबोधिनीच्या बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p
error: Content is protected !!