Tarun Bharat

सांगे तालुक्यातील काजूच्या उत्पन्नात यंदा 50 टक्के घट

Advertisements

उत्पन्नात यंदा 50 टक्के घट : खराब हवामान, अवकाळी पावसाचा परिणाम, नेत्रावळी, वाडे कुर्डीतून काजू कमी प्रमाणात प्राप्त

प्रतिनिधी /सांगे

गेल्या वर्षाशी तुलना केल्यास गोव्याचा यंदाचा काजू हंगाम मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ातच संपला. यंदा सुमारे पन्नास टक्के काजूचे उत्पादन घटल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. खराब हवामान आणि अवकाळी पडलेला पाऊस याचा फटका या उत्पादनाला बसला. काजूचा दर 135 रुपये राहिला. गेल्या वर्षी काजूचे उत्पादन 30 ते 35 टक्के कमी आले होते. यंदा सुरुवातीला काजूच्या झाडांना चांगला मोहर आला होता. मात्र तापमानात कमालीची वाढ झाल्याने मोहर करपला.

राज्यात मागील डिसेंबर महिन्यापासून पाऊस कोसळू लागला होता. मात्र अवकाळीचा पाऊस प्रथम एप्रिल महिन्यात सुरु झाला. त्यानंतर तो अधूनमधून पडतच गेला. त्याचा काजू उत्पादनावर परिणाम झाला. कृषी खात्याकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. सांगे हा तसा मोठा तालुका. काजू उत्पादनातही अग्रेसर. मात्र डोंगराळ भागांत असलेल्या काजूच्या झाडांनाही कमी पीक आले आहे. काजूचे पीक घटल्याने काजूच्या फेणीचे उत्पादनही कमी येणार आहे.

काजूपिकाची पुंजी चतुर्थीपर्यंत मदतीस

काजू हे नगदी पीक असल्याने कित्येक काजू उत्पादक तीन ते चार महिने काबाडकष्ट करून हाती जे पैसे येतात त्यातून पावसाळ्याची बेगमी करतात. घरातील एखादा सोहळा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सर्व बाबी त्यावर अवलंबून असतात. काजू विकून जी पुंजी हातात येते ती पावसाळा सुरू झाल्यापासून गणेश चतुर्थीपर्यंत सर्वसाधारणपणे शेतकऱयांच्या हाती राहते. सांगे तालुक्यात खासगी काजू मळ्यांबरोबर सरकारी वन विकास महामंडळाच्या काजू मळ्यांची संख्याही खूप आहे.

अनुभवी शेतकऱयांच्या मते, काजू झाडांची थोडीफार मशागत करून सेंद्रिय खते दिली आणि झाडांना पाण्याची व्यवस्था केली, तर उत्पादनात कमालीची वाढ होते. हे नेत्रावळी येथील हर्षद प्रभुदेसाई यांनी सिद्ध करून दाखविले आहे. काजू हे बिकट परिस्थितीतही शेतकऱयांना परवडणारे पीक आहे. कोरोनाच्या काळात इतर व्यवसायांना फटका बसला असला, तरी काजूचा हंगाम सुरळीत चालू राहिला. गोव्यात सुमारे 30 हजार शेतकरी कुटुंबे काजू उत्पादनात आहेत. मात्र जाणत्या शेतकऱयांचा काजू व्यवसायात अधिक सहभाग आहे. तरुण शेतकऱयांचा या नगदी पिकाकडे कमी कल आहे असे दिसून येते.

काजू लागवडीस भरपूर वाव

इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडील काजूचे उत्पादन कमी आहे. गोव्यात काजू उत्पादनाला खूप वाव असून शेतकऱयांचे उत्पन्न त्यामुळे कमालीचे वाढू शकते. मध्यंतरी गोव्यासाठी ‘काजू विकास मंडळ’ स्थापन करण्याचा विचार पुढे आला होता. पण तोही पुढे गेला नाही. शेतकऱयांचा नवीन झाडे लावण्याकडे कल दिसून येत नाही. काजूची जुनी मृत झालेली झाडे बदलून ‘गॅप फिलिंग’ केले पाहिजे. कृषी खात्याच्या काजूसाठी अनेक योजना आहेत. नवीन संकरित जातीच्या काजू कलमाची लागवड केली पाहिजे. गोवा स्वयंपूर्ण बनवायचा असेल, तर शेती उत्पादन वाढणे गरजेचे आहे. शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून सरकारकडून प्रति किलो रु. 125 हमीभाव देण्यात येतो. बागायतदार नुकसानात येऊ नये याकरिता किमान 150 रु. हमीभाव मिळावा, अशी शेतकऱयांची मागणी आहे.

अवकाळी पावसाचा जास्त फटका

यंदा इतर पिकांप्रमाणे अवेळी पावसाचा फटका काजू उत्पादनालाही बसला आहे. एरव्ही काजूचे पीक मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळत असे. पण यंदा मे महिन्यात पाऊस पडल्याने काजू गोळा करणे शेतकऱयांना शक्य झाले नाही. अवकाळी पावसाचा काजू उत्पादनावर जास्त परिणाम झाल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. मेच्या दुसऱया आठवडय़ातच काजू हंगाम संपल्याचे शेतकऱयांनी स्पष्ट केले. शेवटी काजूला 130 रु. प्रति किलो असा दर मिळाला.

पीक घटले : मास्कारेन्हस

सांगे भागात सर्वाधिक काजू कुर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेकडून खरेदी केला जातो. या संस्थेचे अध्यक्ष फ्रान्सिस मास्कारेन्हस यांनी यंदा काजूचे पीक घटले आहे, असे सांगितले. नेत्रावळी, वाडे कुर्डी या भागांतून कमी काजू प्राप्त झाला आहे. याशिवाय अनेक जुनी काजूची झाडे रोटा रोगाने दरवर्षी दगावतात. त्यामुळे बागायतींमधील जुनी काजूची झाडे कमी होत चालली आहेत. याविषयी शेतकऱयांनी जागरूक राहून रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याची गरज आहे. त्याकरिता कृषी खात्याची मदत घेता येते.

सांगे व केपे तालुक्यांतील सुमारे 5 हजार क्षेत्रफळात काजूची लागवड होते. यंदा काजूचे उत्पादन घटल्याच्या वृत्ताला केपेचे विभागीय कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी दुजोरा दिला आहे. काजू खरेदी करणारे सांगे येथील व्यापारी दिलेश सांबारी यांनी देखील काजू पीक घटल्याचे सांगितले. काजूच्या पिकाबरोबर अवकाळी पावसाने आंबापिकाचेही नुकसान केले आहे.

Related Stories

भूमिपुत्र विधेयक मागे घेणार : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

नेवरा खाजन बांधाच्या दुरुस्तीत दिरंगाई

Amit Kulkarni

‘स्टार्ट अप’मध्ये गोवा बनणार अव्वल

Amit Kulkarni

गोमेकॉचे माजी डिन खिवराज कामत यांचे निधन

Amit Kulkarni

मांद्रे मतदारसंघ भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी रामा नाईक

Amit Kulkarni

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा वाढवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!