ग्रँडस्लॅम अंतिम फेरीतील स्थान निश्चित करणारा नॉर्वेचा पहिलाच खेळाडू
पॅरिस / वृत्तसंस्था
कॅस्पर रुड हा एखाद्या ग्रँडस्लॅम एकेरीत अंतिम फेरी गाठणारा नॉर्वेचा पहिला टेनिसपटू ठरला. त्याने 2014 अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या मारिन सिलिकला 3-6, 6-4, 6-2, 6-2 अशा फरकाने नमवत हा पराक्रम गाजवला. कॅस्पर रुड जागतिक क्रमवारीत 23 वा मानांकित असून यापूर्वी त्याला कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अगदी चौथी फेरीही पार करता आली नव्हती. कॅस्परचे वडील ख्रिस्तियन 1991 ते 2001 या कालावधीत व्यावसायिक टेनिसपटू राहिले आहेत.
कॅस्पर रुडने आपण क्ले कोर्टवर उत्तम खेळू शकतो, याचा दाखला दिला. त्याच्या खात्यावर कनिष्ठ स्तरावर 7 जेतेपदे असून 2020 पासून त्याला या सरफेसवर 66 विजय मिळवता आले आहेत. आता निर्णायक फायनलमध्ये रुडसमोर 13 वेळचा प्रेंच चॅम्पियन राफेल नदालचे कडवे आव्हान असेल. आश्चर्य म्हणजे रुडने स्पेनमध्ये नदालच्या टेनिस अकादमीतच प्रशिक्षक घेतले असून 36 वर्षीय नदालला तो आपला आदर्श मानत आला आहे.
रुडने सिलिकची सर्व्हिस पाचवेळा भेदत रुडने उत्तम सुरुवात केली. तिसऱया सेटदरम्यान एका महिलेने कोर्टवर उतरत सामन्यात व्यत्यय आणला आणि यामुळे 10 मिनिटे खेळ थांबवावा लागला होता.
व्हेरेव्हला दुखापत, नदाल अंतिम फेरीत
राफेल नदाल हा प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस इतिहासात फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात दुसरा वयस्कर टेनिसपटू ठरला. अलेक्झांडर व्हेरेव्हला उजव्या पायाच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर नदालचे फायनलमधील स्थान निश्चित झाले.
वयाच्या 19 व्या वर्षी पहिली प्रेंच ग्रँडस्लॅम जिंकणाऱया नदालने यंदा या स्पर्धेदरम्यान 36 वा वाढदिवस साजरा केला. येथे त्याने तब्बल दीड तास चाललेला पहिला सेट 7-6 (8) असा जिंकत वरचष्मा गाजवला. त्यानंतर दुसरा सेटही दीड तासाच्या खेळानंतर टायब्रेकमध्ये पोहोचण्याच्या बेतात होता. त्यावेळी व्हेरेव्ह बेसलाईनवर अचानक घसरला आणि त्याला प्रचंड वेदना जाणवल्या. अचानक अगदी चालणेही शक्य होत नसल्याने व्हेरेव्हला नदालने कोर्टच्या बाजूला येण्यास मदत केली. व्हेरेव्हला पुढे व्हीलचेअरवरुन बाहेर जावे लागले.
वास्तविक, नदाल देखील डाव्या पायाच्या दुखण्याने त्रस्त आहे. मात्र, काही सामने अगदी चार तासांपर्यंत रंगले असले तरी त्याने लढवय्या बाणा कायम राखला आहे. नदाल येथे 14 व्या प्रेंच ग्रँडस्लॅम व एकूण 25 व्या ग्रँडस्लॅम विजयासाठी प्रयत्नशील आहे. सध्या जोकोविच व फेडरर यांच्या खात्यावर प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम नोंद आहेत.