पंतप्रधान मोदींकडून जोरदार टीका ः मेहसाणा येथे प्रचारसभा
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी चार प्रचारसभा घेतल्या आहेत. वडोदरा, मेहसाणा, दाहोद आणि भावनगरमध्ये त्यांची सभा पार पडली आहे. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सौराष्ट्रात प्रचारसभा घेतली आहे.
भाजप हा पक्ष व्यक्तीपेक्षा पक्ष अन् पक्षापेक्षा देश मोठा असल्याचे मानणारा आहे. हीच आमची संस्कृती असून आम्ही याच संस्कृतीसोबत काम करतो. परंतु काँग्रेसचे मॉडेल जातीयवाद, परिवारवाद आणि सांप्रदायिकतेचे आहे. काँग्रेस मॉडेलचा अर्थ अब्जावधींचा भ्रष्टाचार असा आहे. देशाची नवी पिढी आता डोळे मिटून विश्वास ठेवणारी नाही, तर काम करणाऱयांचे मूल्यांकन करत निर्णय घेणारी असल्याचे मोदी म्हणाले. 20 वर्षांपूर्वी राज्यात केवळ 55 लाख वीजजोडण्या होत्या. आता ही संख्या 2 कोटी झाली आहे. वीजजोडणीसाठी लोकांना आता भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागत नाही. पूर्वी लोक थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण भटकायचे, तर आता घरांमध्ये दररोज नर्मदेचे पाणी येत आहे. विकासकामे करण्यासाठीच भाजप सरकार सत्तेवर आले हेते असे उद्गार मोदींनी काढले आहेत.