नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उजव्या डोळय़ावर रविवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील लष्करी रुग्णालयात (संशोधन आणि संदर्भ) ही वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली. मुर्मू यांच्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी आर्मी हॉस्पिटलमध्येच त्यांच्या डाव्या डोळय़ावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता 20 नोव्हेंबर 2022 रोजी दुसऱया डोळय़ावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुर्मू यांनी 25 जुलै रोजी भारताचे 15 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.