बिहारमधील आरजेडी फायनान्सरसह 6 नेते रडारवर ः गुरुग्राममधील तेजस्वी यादवच्या मॉलमध्येही धाड
पाटणा, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीआय व ईडीच्या पथकाने बुधवारी देशातील 42 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. सीबीआयच्या पथकांनी बिहारमधील 5 आरजेडी नेत्यांसह 25 घरांवर छापे टाकले. यामध्ये दोन राज्यसभा खासदारांव्यतिरिक्त माजी आमदार आणि आरजेडीचे फायनान्सर अबू दोजाना यांचा समावेश आहे. तसेच एका पथकाने गुरुग्राममधील मॉलमध्ये तपास केला. सदर मॉल तेजस्वी यादव यांचा असल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय लालू यादव यांचे निकटवर्तीय आणि वाळू माफिया सुभाष यादव यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. हे प्रकरण रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात झालेल्या रोजगार घोटाळय़ाशी संबंधित आहे. बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वी पडलेले हे छापे म्हणजे सूडाची कारवाई असल्याचे राजदने म्हटले आहे.
बुधवारी सकाळपासून बिहारसह विविध भागात छापे टाकण्यात आले. झारखंडमधील रांची, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये 17 ठिकाणी ईडीचे छापे सुरू होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळचे असलेले प्रेमप्रकाश यांच्या रांची येथील ठिकाणांची ईडीच्या पथकाने चौकशी केली. सीबीआयचे पथक सकाळी 8 वाजता अबू दोजाना, आरजेडीचे राज्यसभा खासदार अश्फाक करीम, राज्यसभा खासदार फय्याज अहमद आणि आरजेडीचे कोषाध्यक्ष व आमदार सुनील सिंग यांच्या घरी पोहोचले. छापेमारीदरम्यान आमदार सुनील सिंग यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी या छाप्याला सूडाची कारवाई म्हटले आहे.
लालू कुटुंबीय संतप्त
दुसरीकडे, छापेमारीवरून लालूंचे कुटुंबीयही संतप्त झाले आहेत. लालूंची कन्या रोहिणी आचार्य हिने सीबीआयच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला. तसेच राबडीदेवी यांनी आम्ही गप्प बसणाऱयांपैकी नाही, असे स्पष्ट केले. तर तेजस्वी यादव यांनी ‘शंभर सोनार, एक लोहार’ असा टोमणा मारला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या जमिनीच्या बदल्यात रोजगार घोटाळय़ाशी संबंधित प्रकरणावर सीबीआयने तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. यानंतर राबडी देवी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. यामध्ये तेजस्वी यादव यांच्या खोलीतून अनेक कागदपत्रे बाहेर आल्याचे सांगण्यात आले. या छाप्यानंतरच लालू यादव यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱया भोला यादवला अटक करण्यात आली. भोला यादवच्या चौकशीनंतरच सीबीआयने ही कारवाई सुरू केली आहे.
झारखंडमध्ये छाप्यावेळी सापडल्या एके-47
झारखंडमधील खाण घोटाळय़ाप्रकरणी बुधवारी 16 ठिकाणी ईडीचे छापे पडले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेमप्रकाश यांच्या रांचीतील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. याप्रसंगी प्रेमप्रकाश यांच्या घराच्या तिजोरीतून दोन एके-47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 60 काडतुसेही सापडली आहेत. या शस्त्रास्त्रांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.
प्रेमप्रकाश यांच्या जुन्या कार्यालयातही तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कार्यालय बंद होते. प्रेमप्रकाश यांच्या 11 ठिकाणांवर दिवसभर छापेमारी सुरू होती. यापूर्वीही ईडीने प्रेमप्रकाश यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, काही तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांची सुटका केली होती.
अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई
झारखंडमध्ये अवैध खाण उत्खनन झाल्यावरून छापे पडले आहेत. याप्रकरणी एजन्सीने यापूर्वीच अनेक जिल्हय़ांच्या डीएमओंना बोलावून चौकशी केली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या प्रसारमाध्यम सल्लागारासह आमदार प्रतिनिधींचीही चौकशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. तर प्रसारमाध्यम सल्लागाराला दोनवेळा बोलावून त्याची चौकशी करण्यात आली आहे.