वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी आरोपी असणारे आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या जामिनाला विरोध करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना जामीन देण्यात आला होता. शनिवारी सीबीआयने यासंबंधातील अर्ज न्यायालयात सादर केला असून न्यायालयाने यादव यांना नोटीस बजावली आहे.
या कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर यादव यांना 28 सप्टेंबरच्या आत द्यायचे आहे. त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. भारतीय रेल्वेची केटरिंग कंत्राटे देताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. विशेष न्यायाधीश गितांजली गोयल यांनी सीबीआयचा अर्ज नोंद करून यादव यांना नोटीस पाठविली.