दिल्ली-एनसीआरसह 21 ठिकाणांवर कारवाई ः मद्य धोरणामध्ये गैरव्यवहाराचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील मद्य धोरणामध्ये (एक्साईज पॉलिसी) गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापेमारी केली. सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर सीबीआयचे अधिकारी सिसोदियांच्या घरी तपास करत होते. अधिकाऱयांनी त्यांचे आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीतील मद्य धोरणाविरोधात सीबीआयने 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्लीमधील घरी आणि सात राज्यात अन्य 20 ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाविरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. त्यानुसार तपास यंत्रणा सकाळी आठ वाजताच सिसोदिया यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ‘सीबीआय आई है, जिसका स्वागत है’ असे ट्विट करून कारवाईची माहिती व्हायरल केली होती. त्यानंतर आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. दिल्ली सरकार लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. आपल्या देशात चांगले काम करणाऱयांना अशाप्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-1 बनलेला नाही, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
आप-भाजप आमनेसामने
केजरीवाल यांना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे आपने म्हटले आहे. परदेशी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला फोटो दिल्लीतील सरकारी शाळेचा नसून खासगी शाळेचा असल्याचा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. पंजाब निवडणुकीपूर्वी केजरीवाल आणि दारू माफिया यांच्यात डील झाल्याचा आरोपही भाजपने केला होता.
सिसोदियांसह 15 जणांवर सीबीआयकडून गुन्हा
सीबीआयच्या पथकाने उत्पादन शुल्क उपायुक्त असलेले आनंद तिवारी, तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, कुलजीत सिंग, सुभाष रंजन यांच्या घरावरही छापे टाकले. सीबीआयने मद्य धोरण घोटाळय़ाच्या आरोपासंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. सिसोदिया यांच्यग्नासह एकूण 15 जणांची नावे त्यात समाविष्ट आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही दारू कंपन्यांचाही समावेश आहे. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
न्यायालयात सत्य उघड होईल!
मनीष सिसोदिया यांनी कारवाईबाबत नाराजी व्यक्त करताना, दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक नाराज असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही दिल्लीच्या मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षण-आरोग्याची चांगली कामे थांबवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे सांगतानाच न्यायालयात सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या पण काहीही बाहेर आले नाही. आताच्या कारवाईतूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही, असे त्यांनी पुढे सांगितले.
‘आप’चे चांगले काम रोखण्याचा प्रयत्न ः केजरीवाल
सीबीआयच्या कारवाईदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू माध्यमांसमोर व्यक्त केली. संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलवर चांगली चर्चा करत आहे. मात्र केंद्र सरकारला हे थांबवायचे असल्यामुळे दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांवर छापे टाकून अटक करण्यात येत आहे. 75 वर्षात चांगले काम करण्याचा प्रयत्न केलेल्यांना रोखल्यामुळे आज भारत मागे आहे. दिल्लीचे चांगले काम आम्ही थांबू देणार नाही, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. याप्रसंगी अमेरिकेतील सर्वात मोठय़ा वृत्तपत्रात छापून आलेल्या दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलचा संदर्भही त्यांनी दिला.
सिसोदियांचे ट्विट…
आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेले नाही. हय़ा छाप्यांमधूनही काही निष्पन्न होणार नाही. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल.