‘ऑपरेशन मेघचक्र’ अंतर्गत 56 ठिकाणी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या केंद्रीय तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आहेत. एनआयए-ईडीच्या पीएफआयवरील धडाकेबाज छापासत्रानंतर शनिवारी सीबीआयने ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी (बाल लैंगिक शोषण) प्रकरणी देशभरात मोठी कारवाई केली. देशभरात सीबीआयने धडक कारवाई करताना 20 राज्यांमध्ये 56 ठिकाणी छापे टाकले. इंटरपोलच्या माहितीनंतर सीबीआयने देशभरात छापेमारी करत ही मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या धडक कारवाईला ‘ऑपरेशन मेघचक्र’ असे नाव दिले आहे. सीबीआयने मुंबई आणि बेंगळूर या मेट्रोसिटींमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी छापेमारी केली आहे.
इंटरपोलकडून इनपुट मिळाल्यानंतर सीबीआयने देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधितच नाही, तर याचा संबंध लहान मुलांना फिजिकल ब्लॅकमेल, लहान मुलांचे शारीरिक शोषण या प्रकरणाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीकडून वेगवेगळे ग्रुप बनवून आणि वैयक्तिक पातळीवर काम सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.
इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयला सिंगापूरमधून याप्रकरणी विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर सीबीआयकडून देशभरात छापेमारी करत कारवाई करण्यात आली. सध्या देशात एकीकडे दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडीकडून कारवाई सुरू आहे. देशभरात एनआयएने तपास यंत्रणांच्या मदतीने पीएफआय या संघटनेशी संबंधितांवर छापे टाकले आहेत.