विमा अन् किरु जलविद्युत प्रकल्प घोटाळा प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या विमा आणि किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळ्याशी निगडित प्रकरणी सीबीआयने बुधवारी जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि राजस्थानमधील 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे माध्यम सल्लागार राहिलेले सुनक बाली यांच्या घरी देखील छापा पडला आहे.
सीबीआय याप्रकरणी तक्रारदारालाच त्रास देत आहे. सुनक हे कुठल्याही सरकारी वेतनाशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये माझे सचिव होते असा दावा मलिक यांनी केला आहे. सत्यपाल मलिक हे 23 ऑगस्ट 2018 पासून 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. मलिक यांनी संबंधित घोटाळ्यांप्रकरणी स्वत:च तक्रार केली होती.
फाइल्सना मंजुरी देण्याकरता प्रत्येकी 150 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर देण्यात आली होती असा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा नोंदवून मलिक यांचा जबाव नोंदविला होता. शासकीय कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक आणि पत्रकारांसाठी लागू करण्यात आलेल्या समूह आरोग्य विमा योजनेशी निगडित एका फाइलचा मलिक यांनी उल्लेख केला होता. यात अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जनरल इंन्शोरन्स कंपनी सामील होती. मलिक यांनी रिलायन्स जनरल इन्शोरन्स कंपनीसोबतचा करार रद्द केला होता. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचारविरोधी विभागाला याप्रकरणी भ्रष्टाचार झाला आहे का याची पडताळणी करण्याचा आदेश दिला होता.
संघाची मागितली माफी
विमा घोटाळाप्रकरणी मलिक यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला होता. परंतु पुढील काळात त्यांनी संघाची माफी मागितली होती. या घोटाळ्याशी संघाचा कुठलाच संबंध नाही, आपण चुकून टिप्पणी केली असून याप्रकरणी माफी मागू इच्छितो असे मलिक यांनी म्हटले हेते.