नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) शैक्षणिक सत्र 2022-23 साठी दहावी आणि बारावी बोर्डाच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी जारी केले. दहावीची अंतिम परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत चालणार आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून 5 एप्रिल 2023 पर्यंत चालेल. सीबीएसईने सर्व विषयांचे वेळापत्रक जाहीर केले. हे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा शाळांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा करत होते. विविध विषयांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने आता विद्दय़ार्थी जोमाने अभ्यासाला लागणार आहेत.