जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती : 16 हजार परीक्षार्थी देणार परीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी सीईटी दि. 21 व 22 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षार्थींची तपासणी दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रत्येक परीक्षावर्गात सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
सीईटीसाठी नेमलेले जिल्हय़ातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी चिकोडी खाजगी पॉलिटेक्निक येथे मंगळवारी झालेल्या प्रशिक्षणादरम्यान ते बोलत होते. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी परीक्षार्थींच्या तपासणीसाठी पोलीस, महसूल आणि इतर विभागातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परीक्षा पारदर्शक होणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हय़ात सर्वाधिक परीक्षा केंद्रे
बेळगाव जिल्हय़ात सर्वाधिक म्हणजे 62 केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. बेळगावमध्ये 4 हजार 967 तर चिकोडीतून 11 हजार 199 परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत. मोबाईल, डिजिटल घडय़ाळ यासारख्या कोणत्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा केंद्रात नेण्याची परवानगी नाही. परीक्षा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी शिस्तबद्ध काम करावे, अशी हाक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी प्रश्नपत्रिका वितरण व उत्तरपत्रिका संकलनाची वेळ काटेकोरपणे पाळली पाहिजेत, असे सांगितले. परीक्षा केंद्रावर मूलभूत सुविधा आहेत की नाहीत हे आधीच तपासून घ्या, नसेल तर दुरुस्ती करा, असे ते म्हणाले. परीक्षार्थींना तपासण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुरविले जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर, ब्लूटूथचा वापर यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
यावेळी चिकोडी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन हंचाटी, वाहतूक विभागाच्या उपायुक्त पी. क्ही. स्नेहा, बेळगावचे शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, चिकोडी उपविभागाधिकारी संतोष कामगौड यांच्यासह अधिकारी व शिक्षण खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.