वाहतुकीला अडथळा : स्थानिक रहिवासी त्रस्त
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत गटारी, रस्ते, डेनेज वाहिन्या आणि इतर विकासकामे राबविली जात आहेत. मात्र, सीडी वर्क आणि इतर कामे अर्धवट स्थितीत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शिवाय स्थानिक रहिवासी अर्धवट कामांमुळे त्रस्त झाले आहेत. वडगाव, नाझर कॅम्प येथील सीडी वर्कचे काम मागील काही दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा होत आहे.
शहरात अमृत योजनेंतर्गत डेनेज आणि जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याबरोबर स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते, गटारी आणि सीडी वर्कचे काम सुरू आहे. मात्र, बरीच कामे अर्धवट रखडली आहेत. त्यामुळे ये-जा करणे मुश्कील बनले आहे. दरम्यान, अनेक सीडी वर्कचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे सीडी वर्क खचण्याचे प्रकार होत आहेत. परिणामी स्मार्ट सिटी विकासकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पटवर्धन लेआऊटमध्ये घालण्यात आलेल्या सीडी वर्कची काही दिवसांतच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मधोमध असलेल्या या सीडी वर्कमुळे धोका निर्माण झाला आहे. शहरातील विकासकामांना चालना देऊन अर्धवट कामे पूर्ण करावीत, याचबरोबर कामाचा दर्जाही उत्तम राखावा, अशी मागणी रहिवाशांतून होत आहे.