मंत्री शंभूराज देसाई ः प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा उत्साह सातारा जिह्यातील नागरिकांनी उत्साहात व आनंदीय वातावरणात तसेच शांततेत साजरा करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. त्यांनी गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री देसाई म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी विविध परवान्यांची आवश्यकता असते यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. याद्वारे गणेश मंडळाना तात्काळ परवानग्या मिळत आहेत. गणेशोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिह्यातील पोलीस ठाणे प्रभारींनी आपापल्या हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळाची बैठका घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. तरी जिह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करुन जिल्हा प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
कास पठारावरील बांधकामांविषयी मंत्री देसाई म्हणाले, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. मी जिह्यातील मंत्री म्हणून त्यांनी हा मला विषय सांगितला नाही. कदाचित ते हायकामांडशी बोलत असतील. त्यामुळे मला या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही. पण, येथे कायद्याचे उल्लंघन होत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. मी कधीही कासला जात नाही, त्यामुळे तेथील माहिती मला नाही. पण प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली असून त्यांचा अहवाल ते देतील, तो पाहून आम्ही काय ती कारवाई करू. राज्य उत्पादन शुल्क विभागात मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्या कारवाई कमी दिसतात. जिह्यात या विभागात केवळ 43 कर्मचारी असून एकूण 789 दुकाने आहेत. त्यामुळे लवकरच उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी भरती होईल.
मंत्रीपदी महिला नेत्यांची वर्णी लागणार
नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस-शिंदे सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. या सरकारमध्ये सर्वांना समावून घेणार आहे. आता छोटा विस्तार झाला आहे. अजून काही पदे रिक्त आहेत. यावेळी मंत्रीपदी महिला नेत्याची वर्णी लागणार असा संकेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले.