Tarun Bharat

विविध ठिकाणी योग दिन साजरा

गजानन महाराज भक्त परिवार-मारवाडी युवा मंच

श्री गजानन महाराज भक्त परिवार व मारवाडी युवा मंच यांच्यावतीने सात दिवसांचे योग शिबिर घेण्यात आले. योग दिनादिवशी शिबिराची सांगता झाली. यावेळी योगशिक्षक नईम शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सुनीता पानसरे व भादवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निहोत्र करण्यात आले.

डॉ. संजय देशपांडे यांनी पर्यावरणाची माहिती दिली. नागेंद्र पाटील यांनी साऊंड हिंलींग थेरपीचे प्रात्यक्षिक दाखवून ताण-तणाव कसा दूर होतो हे स्पष्ट केले. कल्लाप्पा यांनी गो-मातेचे आपल्या जीवनातील स्थान व महत्त्व याबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमात मारवाडी युवा मंचतर्फे अध्यक्ष मधुसूदन भट्टड, उपाध्यक्ष कमलेश राजपुरोहित, सचिव जितेंद्र बोकाडीया, महिला शाखेच्या मनीषा उपाध्याय, पवन राजपुरोहित, रश्मी ओझा व उपासना राजपुरोहित, युवा शाखेच्या ऐश्वर्या सारडा, निधी अग्रवाल तसेच निरामय आरोग्याच्या अश्विनी, शुभा पाटणकर, नीना काकतकर, संध्या शानभाग यांच्यासह अनेक सदस्य व नागरिक उपस्थित होते.

आराधना शाळा

आराधना विशेष मुलांच्या शाळेत योगदिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले व त्यांच्याकडून आसने करवून घेतली. क्रीडा शिक्षक रशीदभाई यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखविली. याप्रसंगी मारुती कुंभार, जी. एस. पाटील, नंदा लोहार, अश्विनी पवार, किशोर जुवेकर आदी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला.

मराठा मंदिर

मराठा मंदिर येथे आप्पासाहेब गुरव यांच्या अध्यक्षतेखाली योग दिन साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधीर कामत उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. एस. के. पाटील, योगमहषी रामजी गडगाणे, गिरीश तेंडोलकर उपस्थित होते. डॉ. सुधीर कामत यांनी योगाची महती व त्याचे अनुभव सांगितले. 40 वर्षांपासून योग सराव करणारे रामजी यांनी योगाचे महत्त्व आणि फायदे सांगितले. याप्रसंगी उपस्थित 150 हून अधिक साधकांनी सूर्यनमस्कार घातला.

इन्फंट्री हाऊस

इन्फंट्री हाऊस येथे योग प्रशिक्षक सुकून निराणी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी 75 हून अधिक महिलांनी योग सराव केला. यावेळी दीपा बाजवा, मेजर जनरल पी. एस. बाजवा तसेच लष्करी अधिकाऱयांच्या पत्नी, अन्य महिला व नागरिक योग दिनात सहभागी झाले होते. सुकून यांनी सर्वांकडून योगासने करून घेतली.

एनसीसी योग दिन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एनसीसी 26 बटालियन आणि 8 एअर स्क्वॉड्रन एनसीसी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन जाधवनगर येथील एनसीसी कॅम्पस येथे साजरा करण्यात आला.

सिनियर डिव्हिजन / सीनियर विंग आणि ज्युनियर डिव्हिजन/ ज्युनियर विंगच्या विविध संस्थांच्या 200 हून जास्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

बेळगाव, हुबळी, धारवाड, कारवार जिल्हय़ातील आणि गोवा राज्यातील संघाच्या 12 एनसीसी यूनिटचे अधिकारी आणि छात्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

एनसीसी 26 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आर. खजुरीया, 8 कर्नाटक एअर स्क्वॉड्रन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. दर्शन, सुभेदार मेजर निलेश देसाई, सुभेदार वसंत महागावकर, ज्युनियर वॉरंट ऑफिसर सतीशकुमार, सी. आर. बिजू, ऑफिस सुपरिटेंडेंट सुभाषचंद्र चिक्कप्पणवर यांच्यासह इतर संरक्षण आणि प्रशासकीय कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. 

जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन

मानवतेसाठी योग या घोषवाक्मयाला अनुसरून जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्ण विधानसौध येथे योगदिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काऊट व गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, आरसीयूचे कुलगुरू प्रा. रामचंद्र गौडा, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुलधाळी, शंकरगौडा पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

सर्व अधिकाऱयांनी व उपस्थितांनी योगतज्ञ आरती संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, भुजंगासन, सलभासन यासह विविध आसने केली. सर्वांनी अनुलोम-विलोम व प्राणायाम केले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, सर्वांनी दररोज योगासने करावीत. जेणेकरून आपले आरोग्य व आपला देशही सुदृढ राहील. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेले अथर्व सवनूर व दक्षा बेविनमरद यांनी भरतनाटय़ाद्वारे योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. 

एक्सलंट योगातर्फे योग दिन

मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून शंकरराव कुलकर्णी संचालित एक्सलंट योगा क्लासेस (पतंजली विद्या धाम) च्यावतीने मंगळवारी योग दिन साजरा करण्यात आला. विविध आसने व प्राणायामनंतर योगशिक्षिका सुनीता पानसरे यांनी मार्गदर्शन केले.

योगामध्ये फार मोठी शक्ती आहे. नियमित योग केल्याने अनेक असाध्य रोग बरे होतात. योगमहषी रामदेव बाबांनी योग आणि आयुर्वेद यांचा संयोग साधून फार मोठे कार्य केले आहे. कपालभाती व अनुलोम विलोम हे प्रत्येकाला जरुरीचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अनंत लाड यांनी प्रास्ताविक केले. गोपाळराव बिर्जे यांनी स्वागत केले. नगरसेवक मंगेश पवार, शंकरराव कुलकर्णी व एस. आर. कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले. महादेव पुणेकर यांनी आभार मानले.

नैर्त्रुत्य रेल्वेतर्फे योग दिवस

हुबळी : हुबळीतील नैर्त्रुत्य रेल्वे मुख्य कार्यालय रेल सौदमध्ये आंतराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने ’मानवतेसाठी योग’ साजरा करण्यात आला. नैर्त्रुत्य रेल्वे मुख्य प्रबंधक संजीव किशोर यांचा नेतृत्वात सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, भारत स्काऊट व गाईड कर्मचारी व परिवारच्या सदस्यांनी योगा दिवस कार्यक्रमामधे भाग घेतला.

नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील हुबळी, बेंगळुर आणि म्हैसूर विभागात योगा दिवसाचे आचरण करण्यात आले. रेल्वेमधील सर्व कार्यालयामधील एकूण सोळा हजाराहून अधिक लोकांनी 150 ठिकाणी योग कार्यक्रममध्ये भाग घेतला. कैवल्य योग संस्थेच्या दुपारच्या बॅचच्या महिलांनी योग  दिन साजरा केला. दुपारी सर्व उपस्थित महिलांनी योगासने केली.

विक्रमादित्य युद्धनौकेवर नौसेना कर्मचाऱयांचे योग प्रदर्शन

कारवार : जिल्हय़ातील अनेक ठिकाणी मंगळवारी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. येथून जवळच्या सीबर्ड नाविक दल प्रकल्पस्थळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुमारे तीन हजार योगप्रेमी सहभागी झाले होते. तरंगते बेट म्हणून ओळखल्या जाणाऱया आय. एन. एस. विक्रमादित्य युद्धनौकेवर सुमारे 300 नौसेना कर्मचाऱयांनी योग केलेचे प्रदर्शन घडविले. येथील पोलीस कल्याण मंडपमध्ये आयोजित केलेल्या योग दिन कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, स्थानिक आमदार रूपाली नाईक, विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, कारवार नगराध्यक्ष डॉ. नितीन पिकळे, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यदर्शी, जिल्हा फोर्स प्रमुख आदी सहभागी झाले होते.

रावसाहेब वागळे महाविद्यालयात योग दिन

खानापूर : खानापूर येथील लोकमान्य सोसायटी संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या शरयू कदम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खानापूर पतंजली योग पिठाचे अध्यक्ष नृसिंह भट होते. तसेच त्यांचे सहकारी योगशिक्षक रामचंद्र सावंत, शंकर गुरव व योगशिक्षिका पार्वती गुरव, दीपा सोहम, हेमांगी खासनिस उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नृसिंह भट म्हणाले की, योग भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आपले जीवन उत्साही व निरोगी बनविण्यासाठी व उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी योग हे संजीवनीचे काम करते, असे सांगितले.

 त्यांनी काही योगासनाची प्रात्यक्षिके दाखविली. त्यामध्ये वज्रासन, पद्मासन, कपालभाती, प्राणायम, अनुलोम-विलोम, वक्रासन, त्रिकोणासन या आसनांची माहिती व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच दिवसातून काही वेळ योग करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी तालुकास्तरीय झालेल्या क्रीडा स्पर्धेतील योग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली विद्यार्थिनी साक्षी सुतार हिनेसुद्धा योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविली आणि विद्यार्थ्यांना योगा करण्यास प्रेरित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागेश मुरगोड यांनी केले.

Related Stories

विकेंड मागे तरीही उलाढाल कमीच

Amit Kulkarni

लोकमान्यच्या भाग्यनगर शाखेमध्ये महिला दिन

Amit Kulkarni

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 63.47 लाख देण्याचे आदेश

Patil_p

लहानग्यांच्या हातातून बापाच्या मूर्ती

Patil_p

पुढील आठवडय़ात केवळ 3 दिवस बँका राहणार सुरू

Patil_p

नंदिहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षपदी निंगव्वा कुरबर यांची निवड

Amit Kulkarni