दोन दिवस आयोजित कार्यक्रमांना शिवप्रेमीं भव्य उपस्थिती
वार्ताहर /किणये
सावगाव गावातील शिवस्मारकाचा दुसरा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवार व गुरुवार असे दोन दिवस विविध कार्यक्रम झाले. यावेळी शिवप्रेमी नागरिकांची मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती. सावगाव गावातील शिवस्मारक ज्याचा 2021 सालच्या गुढीपाडव्याला प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा पार पाडला. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला शिवस्मारकाचा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. त्याप्रमाणेच यावर्षीही या श्रीशिवस्मारकाचा दुसरा वर्धापनदिन दोन दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. बुधवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी पाच ते सात या वेळेत काकड आरती, त्यानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते गुढी उभारणी पुजन झाले. त्यानंतर गावातील देवस्की पंचकमिटी आणि ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर व कार्यकर्त्यांच्या हस्ते गावकऱयांच्या उपस्थितीत मुर्ती अभिषेक व नित्यपुजा पार पडली.
त्यानंतर रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. संध्याकाळी सातनंतर गावातील भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. यल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मान्यवरांच्या व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत श्रीगणेश मित्रमंडळ सुळगा(हिं) प्रस्तुत श्रीशिवप्रताप या महानाटय़ांचं सादरीकरण झाले. गुरुवारी सकाळी नुतन ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक व नित्यपुजा करण्यात आली. संध्याकाळी डॉ.मधुरा गुरव(मोटारचे) यांचे व्याख्यान झाले. देव देश धर्म आणि आपली हिंन्दु संस्कृती महिला सशक्तीकरण विषयावर गुरव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवप्रतिष्ठानो तालुका कार्यवाह कल्लाप्पा परशराम पाटील यांनी आभार मानले.