बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील छत्रे वाडा येथे भारत युवक मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर व गल्लीतील पंच विजय हुंदरे यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. भारत युवक मंडळ अनसुरकर गल्ली, बेळगाव यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव मंडळाच्या चित्ररथावर सहभाग घेऊन शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केलेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कौतुक करण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी सावरकरांच्या जीवनाबद्दल, त्यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या कार्याबद्दल, त्यांच्या देशभक्तीबद्दल माहिती दिली. अंदमान, निकोबार येथे त्यांच्या काळय़ापाण्याच्या शिक्षेचा व त्यांच्या शिवभक्तीचा आढावा घेतला. त्यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या गीताबद्दल व त्यांनी लिहिलेल्या शिवगीतेबद्दल माहिती दिली. बेळगावच्या हिंडलगा कारागृहात तीन महिन्यांचा कारावास भोगल्याने बेळगावलाही ऐतिहासिक महत्त्व लाभल्याचे सांगितले.
यावेळी विलास पेडणेकर, हेमंत शिंदे, मिलिंद कदम, संदीप मुरकुटे, अनिल नारळीकर, वैभव हुंदरे, अमित पेडणेकर, अनुप नारळीकर, चैतन्य देशपांडे, सौरभ जोशी, विशेष आंबेवाडीकर, अथर्व नाईक तसेच गल्लीतील पंच, युवक मंडळाचे सदस्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.