मुरगावला पक्षांतराचे गांभिर्य नाही, काँग्रेस भाजपाच्या गोटात शांतता,22 वर्षांनंतर मुरगावात काँग्रेस ते भाजपा पुन्हा पक्षांतर
प्रतिनिधी /वास्को
आमदार संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्याने गोव्यातील उर्वरीत सात मतदारसंघांप्रमाणेच मुरगावच्या राजकारणातही आता परीवर्तन सुरू झाले आहे. मुरगाव मतदारसंघात नाराजी कमी आणि खुषी जास्त असे चित्र काल बुधवारी दिसून आले. काँग्रेस पक्षांर्तंगत विरोध किंवा निषेधही जाणवला नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केलेली नाही. तर सर्वसामान्य नागरिकांनी पक्षांतराचा हा प्रकार फारसा गांभिर्यानेही घेतलेला नाही. मुरगाव मतदारसंघात 22 वर्षांनंतर पुन्हा पक्षांतर झाले आहे. दोन्ही वेळा झालेल्या घाऊक पक्षांतरामध्ये मुरगावच्या आमदारांनी सहभाग घेतलेला आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर जवळपास वीस वर्षे आमदारकीसाठी संघर्ष करीत होते. सतत तीन वेळा त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी लाभली. पैकी दोन वेळा त्यांना यशाने हुलकावणी दिली. पहिल्या वेळी 800 मतांच्या फरकाने तर दुसऱया केवळ 140 मतांच्या फरकाने त्यांना हार पत्कारावी लागली. मात्र, तिसऱया वेळी मागच्या निवडणुकीत संकल्प आमोणकर यांनी 2000 हजार मतांनी विजय प्राप्त करून मागच्या दोन निवडणुकांचा वचपा काढला. सतत तीन वेळा आमदार बनून दोन वेळा मंत्रीपद भुषवलेल्या मिलिंद नाईक यांना अखेर त्यांनी जबरदस्त धक्का दिला. संकल्प आमोणकर अखेर आमदार बनले. पहिल्याच विधानसभा अधिवेशनात त्यांनी आपल्या कामगीरीची चुणुकही दाखवली. संकल्प आमोणकर यांचे यश हेच काँग्रेस पक्षाचे यश आणि काँग्रेस पक्षाचे यश हेच संकल्प आमोणकर यांचे यश असे समजले जात होते. मात्र, आमोणकर यांनी आता पक्षांतर केल्याने या समजाला ठेच बसलेली आहे. मुरगाव मतदारसंघात काँग्रेसचे एकगठ्ठा मतदार मोठय़ा संख्येने आहेत. 2007 पूर्वी या मतदारसंघात सतत काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिले होते. 2007 मध्ये भाजपाने ही जागा जिंकली तरी मागच्या तीन निवडणुकांमध्ये भाजपाचा मतदारवर्गही काँग्रेसच्या बाजुने वळला होता. मागच्या निवडणुकीत तर भाजपाचा मोठा मतदार वर्ग माजीमंत्री मिलिंद नाईक यांच्यावरील नाराजीमुळे संकल्प आमोणकर यांच्या बाजुने वळला होता. त्यातूनच संकल्प आमोणकर आमदार बनले. आता त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून राजकारणाला कलाटणी दिलेली आहे. परंतु बुधवारी दिवसभरात त्यांच्या पक्षांतराचे पडसाद मात्र फारसे उमटले नाहीत. आमदार संकल्प आमोणकर संध्याकाळी हेडलॅण्ड सडय़ावर आपल्या कार्यकर्त्यांसोबतच होते. कार्यकर्त्यांनी व आमदारांनी आनंदच साजरा केला.
मुरगावात विरोध नाही निषेधही नाही, केवळ चर्चा
आमदार संकल्प आमोणकर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा मागच्या जवळपास चार महिन्यांपासूनच होती. आज ना उद्या हे होणारच असेच बहुतेकांना वाटत होते. अखेर इतर सात आमदारांसमवेत संकल्प आमोणकरही भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळेच गोव्यातील इतर सात मतदारसंघाप्रमाणेच मुरगावच्या राजकारणालाही कलाटणी मिळालेली आहे. बुधवारी दिवसभर या राजकारणाचीच चर्चा हेडलॅण्ड सडा व बायणा भागात होती. पंधरा वर्षे मुरगावचे आमदार व मंत्रीपद उपभोगलेल्या मिलिंद नाईक व त्यांच्या समर्थकांचे भवितव्य काय अशी चर्चाही पसरली होती. मात्र, आमदार संकल्प आमोणकर यांना स्थानिक पातळीवर जाहीररीत्या कोणीही विरोध केलेला नाही. तसेच आमोणकर यांच्या काँग्रेस फुटण्याच्या प्रकाराचा स्थानिक पातळीवर काँग्रेसमधूनही विरोध किंवा निषेध दिवसभरात जाणवला नाही. उलट भाजपाच्या बऱयाच कार्यकर्त्यांनी आमदार संकल्प आमोणकर यांचे भाजपात स्वागतच केले. संकल्प आमोणकर आणि काँग्रेसचे म्हणून ओळखले जाणाऱया कार्यकर्त्यांनी तर हेडलॅण्ड सडा येथे आमदार आमोणकर यांच्या भाजपा प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे मुरगावात या पक्षांतराचे फारसे पडसाद उमटण्याची शक्यता कमी दिसत आहे.
भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱयांकडून आमदार आमोणकर यांचे स्वागतच
मुरगावात आता भाजपाकडे एक आजी आमदार आणि एक माजी आमदार असे दोन नेते आहेत. माजी आमदारांचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने आहेत. दोन्ही गटांची दिलजमाई होते की एकमेकांच्या विरोधात त्यांचे राजकारण चालूच राहते हे पुढील काळातच स्पष्ट होईल. भाजपाचे माजी आमदार आपल्या समर्थकांना घेऊन आपल्याला हवा तो निर्णय घेऊ शकतात. किंवा ते सद्यपरिस्थितीत शांत राहणे पसंद करू शकतात. सोयीच्या राजकारणाची कोणतीही संधी त्यांना सध्या नाही. मुरगाव भाजपाचे मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर यांना आमदार संकल्प आमोणकर यांच्या पक्षांतराविषयी विचारले असता, या पक्ष प्रवेशाला कोणाचाही विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय भाजपाने पक्षाच्या हितासाठीच घेतलेला असावा. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते भाजपाबरोबरच राहतील. कुणीही नाराज नाहीत. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्यासमोर हा विषय मांडावा. पुढे कसे काय करावे यासंबंधी मार्गदर्शन करावे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे सातार्डेकर म्हणाले. पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रसाद प्रभुगावकर यांनी सांगितले की, भाजपाचे कार्यकर्ते कुणा नेत्यासाठी कार्य करीत नाहीत ते पक्षासाठी कार्य करतात. आमदार संकल्प आमोणकर यांचा भाजपा प्रवेश हा पक्षाचा निर्णय आहे. कार्यकर्ते तो मानून घेतील. यापूर्वीही मिलिंद नाईक यांना पक्षाने प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. ती कार्यकर्त्यांनी मान्य केली होती असे स्पष्ट केले. भाजपा आणि माजीमंत्री मिलिंद नाईक यांचे खंदे समर्थक व मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी आमदार संकल्प आमोणकर यांचे भाजपात स्वागत केले आहे. आता मुरगावच्या विकासाला गती येईल. मुरगाव तालुक्यातील तीन आमदार भाजपासोबत होते आता चौथाही आल्याने सर्वत्र विकास होणार असे ते म्हणाले.
भाजापा प्रवेश कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच
आमदार संकल्प आमोणकर यांचा भाजपाप्रवेश साजरा करताना हेडलॅण्ड सडय़ावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जुने भाजपा कार्यकर्तेही एकत्र आले होते. भाजपा प्रवेशाचा हा निर्णय आमदार संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि इतर पाठीराख्यांनाही विश्वासत घेऊनच घेतलेला आहे. सर्वांनी त्यांना हा निर्णय घेण्यासाठी पाठींबा दिला होता. त्यामुळे कुणीच त्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केलेला नाही असे काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. किरकोळ नाराजी असून शकते. मात्र, बहुतेकांमध्ये समाधान आहे. माजीमंत्र्यांचे आणि आमदार आमोणकर यांचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कार्य करतील. कोणीच विरोधात राहणार नसल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा
गोवा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा यांनी या पक्षांतराला काँग्रेसचे नेतेच सर्वस्वी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. हे नेते निवडणुकीवेळी गोव्यात येतात आणि केवळ दिखाऊपणा करतात. त्यांचा आपल्याच आमदारांवर कोणतेही नियंत्रण नसते. हा भाजपा प्रवेश शंभर टक्के होणारच होता. हे काँग्रेसच्या नेत्यांनाही माहितच होते. काँग्रेसला पक्षंतराची सवयच झालेली आहे. या पक्षांतराबाबत आपल्याला आश्चर्य वाटत नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार कार्लुस आल्मेदा
वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काँग्रेसचे आमदार फुटणार हे गोव्यातील जनतेला माहित होते. यात नवीन काहीच नाही. बरे झाले ते लवकर गेले. आता पक्षाला पुनर्बांधणी करता येईल असे स्पष्ट केले. मुरगाव तालुक्यात काँग्रेसला चांगली संधी आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसून येईल अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
मुरगावात 22 वर्षांनंतर पुन्हा काँग्रेस ते भाजपा पक्षांतर
मुरगाव तालुक्यात आता भाजपा आमदारांची संख्या तीन झाली आहे. चौथे अपक्ष आमदार अँथनी वास हेसुध्दा भाजपासोबतच आहे. मुरगाव तालुक्यातील वास्को, मुरगाव मतदारसंघांतील आमदारांनी यापूर्वी पक्षांतरे केलेली आहेत. वास्कोत स्व. डॉ. विल्प्रेड मिस्कीता यांनी 1994 मध्ये काही आमदारांसह मगोतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी बरीच खळबळ माजली होती. त्यानंतर 2000 साली मुरगावचे आमदार स्व. शेख हसन हरूण व वास्कोचे आमदार जुझ फिलीप डिसोजा यांनी इतर आमदार काँग्रेस आमदारांसमवेत भाजपात प्रवेश केला होता. 22 वर्षांनंतर मुरगाव मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपा असे पक्षांतर पुन्हा झालेले आहे.
मुरगावच्या जनतेवर अन्याय होऊ नये यासाठीच भाजपा प्रवेश – संकल्प आमोणकर
आपण मुरगावमधून तीन वेळा निवडणुक लढवली. दोन वेळा आपण हरलो. परंतु मुरगावची जनतेने मला कायम पाठींबा दिला. आपली साथ त्यांनी सोडली नाही. शेवटी त्यांनी तिसऱया निवडणुकीत मला निवडून दिले. आपण त्यांनी घेतलेले कष्ट विसरू शकत नाही. या जनतेसाठी काही तरी करायलाच हवे. त्यांना न्याय द्यायलाच हवा या प्रामाणिक हेतूनेच आपण जनतेला विश्वासात घेऊनच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. जनतेच्या हिता व्यतिरीक्त भाजपाला कोणतीही अट घातलेली नाही असे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुक जिंकल्यानंतर मागच्या सहा महिन्यांपासून आपल्याला अनेक गोष्टींची प्रचिती आली. आपण विरोधात असल्यामुळे जनतेवर अन्याय होऊ नये म्हणून आपण मतदारसंघातील कार्यकर्ते व जनतेशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्यात आपला कसलाही स्वार्थ नाही, आपले विकासालाच प्राधान्य असेल असे आमदार आमोणकर यांनी म्हटले आहे.