मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार ः छुप्या सशुल्क प्रमोशनपासून ग्राहकांची सुटका होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱयांसाठी केंद्र सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. ऑनलाईन ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार येत्यात आठ-दहा दिवसांत एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) जारी करू शकते. त्यानुसार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना लवकरच ब्रँडशी त्यांचा संबंध जाहीर करावा लागेल, अन्यथा त्यांना मोठा दंड ठोठावला जाईल.
ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या खोटय़ा दाव्यांपासून सावध करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी सोशल मीडियासाठी आणखी प्रभावी निर्बंध लागू करण्याची तयारी सरकारने केली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एखाद्या विशिष्ट ब्रँडची जाहिरात करत असल्यास त्याला आता ब्रँडबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्याला याविषयी डिस्क्लेमर देखील द्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱयाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि एखाद्या व्यक्तीने नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास त्याला 50 लाख रुपयांपर्यंत मोठा दंड भरावा लागेल. ती कितीही मोठी सेलिब्रिटी असली तरी दंड भरावाच लागेल, असेही संकेत मिळत आहेत.