वृत्तसंस्था/ कोलंबो
शुक्रवारपासून गॅले मैदानावर सुरू झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी यजमान लंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 5 बाद 298 धावा जमविल्या. लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतके झळकविली.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी मोठय़ा फरकाने जिंकून लंकेवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. या दुसऱया कसोटीसाठी लंकन संघातील प्रभात जयसूर्या, कमिंदू मेंडीस आणि महेश तिक्ष्णा यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. लंकन संघातील काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने या कसोटीसाठी 3 नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. 5 व्या षटकात सलामीचा वॉर्नर रजिताच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 5 धावा जमविल्या. उस्मान ख्वाजा आणि लाबुशाने यांनी दुसऱया गडय़ासाठी 55 धावांची भर घातली. मेंडीसने ख्वाजाचा त्रिफळा उडविला. त्याने 77 चेंडूत 4 चौकारांसह 37 धावा जमविल्या. लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 134 धावांची भागीदारी केली. जयसूर्याने लाबुशानेला डिक्वेलाकरवी यष्टीचीत केले. त्याने 156 चेंडूत 12 चौकारांसह 104 धावा झळकविल्या. लाबुशानेचे विदेशातील हे पहिले कसोटी शतक आहे. जयसूर्याने टेविस हेडला 12 धावांवर बाद केले. कॅमेरून ग्रीन जयसूर्याच्या गोलंदाजीवर 4 धावांवर पायचीत झाला.
बऱयाच काळापासून फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडणाऱया स्टीव्ह स्मिथने दमदार शतक झळकविले. तो 14 चौकारांसह 109 धावांवर तर कॅरे 2 चौकारांसह 16 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे प्रभात जयसूर्याने 90 धावात 3 तर रजिता आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेचा संघ या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प. डाव 90 षटकात 5 बाद 298 (स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 109, लाबुशाने 104, उस्मान ख्वाजा 37, वॉर्नर 5, हेड 12, ग्रीन 4, कॅरे खेळत आहे 16, जयसूर्या 3-90, रजिता 1-56, रमेश मेंडीस 1-10).