जिल्हय़ात 16 हजार 166 परीक्षार्थी : परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी सीईटी शनिवार दि. 21 व रविवार दि. 22 रोजी होणार आहे. बेळगाव जिल्हय़ातील एकूण 62 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्हय़ात एकूण 16 हजार 166 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. बरेच शिक्षक निवृत्त झाल्यामुळे जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी राज्य सरकारने यावषी 15 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण कर्नाटकासाठी 5 हजार तर उर्वरित कर्नाटकासाठी 10 हजार पदे भरून घेतली जाणार आहेत. मराठीसह कन्नड, उर्दू, तमिळ या विषयांच्या शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
परीक्षार्थीची दोनवेळा तपासणी केली जाणार
पीएसआय भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याने सीईटी परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडण्यासाठी सर्वच विभागानी कंबर कसली आहे. प्रत्येक परीक्षार्थीची दोनवेळा तपासणी केली जाणार आहे. मोबाईल, डिजिटल वॉच यासह कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा केंद्रांवर नेण्यास बंदी असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस तसेच इतर अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 4967 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 11 हजार 199 परीक्षार्थीनी अर्ज केला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 26 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. राज्यात 1 लाख 6 हजार परीक्षार्थी सीईटी देणार आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
बेळगाव शहरात 25 परीक्षा केंद्रे
बेळगाव शहरातील 25 परीक्षा केंद्रांवर सीईटी परीक्षा होणार आहे. सरदार हायस्कूल, शर्मन हायस्कूल, शर्मन कन्नड हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, मराठी विद्यानिकेतन, वनिता विद्यालय, बेननस्मिथ हायस्कूल, महिला विद्यालय इंग्लिश हायस्कूल, महिला विद्यालय हायस्कूल, जी. ए. पदवीपूर्व कॉलेज, एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल, टिळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श विद्यालय, केएलई हायस्कूल, भरतेश हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, इस्लामिया पदवीपूर्व कॉलेज, सेंट ऍन्थोनी कन्नड स्कूल, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, सेंटपॉल्स हायस्कूल, डिव्हाईन प्रॉव्हिडन्स हायस्कूल, सरकारी चिंतामणराव हायस्कूल, गोमटेश हायस्कूल, सिद्धेश्वर पदवीपूर्व कॉलेज, लिटल स्कॉलर ऍकडमी हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.