पंतप्रधान मोदींना भेटले राहुल गांधी : संरक्षणमंत्र्यांकडून जाणून घेतली युक्रेनची स्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. कामकाज स्थगित होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. सभागृहात संमत विधेयकांसोबत खासगी संकल्पावर झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. अधिवेशन स्थगित झाल्यानंतर अनौपचारिक चहा बैठकीत पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परस्परांना अभिवादन केले. राहुल गांधी यांनी बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना युक्रेनच्या स्थितीविषयी विचारणा केली असता भारत यावर करडी नजर ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तारुढ अन् विरोधक सामील
अनौपचारिक बैठकीच्या छायाचित्रात पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, पीयूष गोयल, चिराग पासवान दिसून आले.