दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव
मोटारसायकलवरून आलेल्या एका भामट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केल्याची घटना बुधवारी रात्री चन्नम्मानगर परिसरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
भागिरथी मंजुनाथ जोशी (वय 61, रा. राणी चन्नम्मानगर, दुसरा स्टेज) या दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी समोरून सुसाट वेगाने मोटारसायकलवरून एक भामटा आला. डोळ्यावर प्रखर प्रकाश पडल्यामुळे भागिरथी यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी करून बाजुला थांबल्या.
भागिरथी या रस्त्याशेजारी थांबताच भामट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्राला हिसडा मारला. 7 ग्रॅमचा तुकडा भामट्याच्या हाती लागला तर उर्वरित तुकडा खाली पडल्याचे सांगण्यात आले. कम्युनिटी हॉलजवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर उद्यमबाग पोलिसांना माहिती देण्यात आली.
उद्यमबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंगळसूत्र पळविणाऱ्या भामट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र सुसाटवेगाने भामट्याने तेथून पलायन केले. उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अधिवेशनाच्या तोंडावर….
पोलीस यंत्रणा सध्या विधिमंडळ अधिवेशन बंदोबस्ताच्या तयारीत गुंतले आहे. यासाठी शहरात जादा कुमक मागविण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे उपनगरांतील नागरिक भयभीत झाले आहेत.