वृत्तसंस्था/ बेलग्रेड (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 2022 विश्व कुस्ती स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक जेत्या भारतीय मल्ल रविकुमार दहियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचप्रमाणे भारताचा आणखी एक मल्ल नवीन मलिकला पराभव पत्करावा लागला आहे. विश्व कुस्ती स्पर्धेत आतापर्यंत सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जाणारा भारतीय मल्ल बजरंग पुनियाची 65 किलो वजन गटातील लढत शनिवारी येथे होत आहे. बजरंगने या स्पर्धेत आतापर्यंत तीन पदके मिळविली आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱया रविकुमार दहियाला विश्व कुस्ती स्पर्धेत पुनरावृत्ती करता आली नाही. शुक्रवारी झालेल्या पहिल्याच फेरीतील लढतीत उझ्बेकचा मल्ल तसेच माजी आशियाई विजेता अब्दुलेवने दाहियाचा 57 किलो गटात 10-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव केला. 2019 विश्व कुस्ती स्पर्धेत दाहियाने कास्यपदक मिळविले होते. या पराभवामुळे भारताची कास्यपदक मिळविण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र उझ्बेकच्या अब्दुलेवला या वजनगटात अंतिम फेरी गाठता आली नाही.
पुरुषांच्या 70 किलो वजन गटातील कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या नवीन मलिकला इर्नाझेर अकमातेलिवकडून 1-4 अशा गुणाने पराभव पत्करावा लागला. भारताच्या नवीन मलिकने या गटातील पहिल्या लढतीत आशियाई विजेत्या कझाकच्या तेलगेटचा 11-3 अशा गुणांनी पराभव करून दुसरी फेरी गाठली होती. दुसऱया फेरीत मलिकला उझ्बेकच्या बेकबुलेटोवकडून पुढे चाल मिळाली होती.
74 किलो वजन गटामध्ये झालेल्या लढतीमध्ये भारताच्या सागर जेगलानने इस्त्रायलच्या फिनेसिल्वर आणि त्यानंतर मेक्सिकोच्या झार्कोचा तांत्रिक सरस गुणावर पराभव केला. पण त्यानंतर सागरला अमेरिकेच्या कायली डेककडून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हार पत्करावी लागली. 92 किलो वजन गटात पोलंडच्या रॅडोस्लेवोने भारताच्या विकी हुडाचा 4-3 असा पराभव केला. या स्पर्धेत आतापर्यंत भारताची मल्ल विनेश फोगटने एकमेव पदक मिळविले आहे.