वृत्तसंस्था/ कोलंबो
27 ऑगस्टपासून सुरू होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 18 जणांच्या लंकन संघातील वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीरा याला दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे. आता या स्पर्धेसाठी चमीराच्या जागी नोवान तुषाराची निवड करण्यात आली आहे.
लंकन क्रिकेट मंडळाने या आगामी स्पर्धेसाठी गेल्या शनिवारी आपला संघ जाहीर केला होता. बिनुरा फर्नांडो आणि केसुन रजिता हे अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नसल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लंकन संघामध्ये दिलशान मदुशंका, प्रमोद मधुसेन, असिता फर्नांडो आणि एम. पथीराणा यांचा समावेश करण्यात आला आहे. आता यामध्ये 28 वषीय तुषाराची भर पडली आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये 28 वषीय तुषाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले असून त्याने चार टी-20 सामन्यात दोन गडी बाद केले आहेत.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंकन संघाचा ‘ब’ गटात समावेश आहे. लंकेचा सलामीचा सामना 27 ऑगस्टला अफगाणविरुद्ध दुबईमध्ये होणार आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना बांगलादेशबरोबर 1 सप्टेंबरला होईल.
लंकन संघ- दसुन शनाका (कर्णधार), डी. गुणतिलका, पी. निशांका, कुशल मेंडीस, सी. असालेंका, भानुका राजपक्षे, ए. बंदारा, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, महेश तिक्षणा, व्हॅन्डरेसी, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, एम. पथीराणा, एन. फर्नांडो, दिनेश चंडीमल आणि एन. तुषारा.