दिव्यांगांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविले यश
प्रतिनिधी/बेळगाव
आज जागतिक दिव्यांग दिन. अनेकदा दिव्यांग म्हणजे ज्यांचे दिव्यांगत्व ठळकपणे दिसते. त्यांनाच दिव्यांग समजले जाते. मात्र असेही दिव्यांग आहेत, ज्यांचे दिव्यांगत्व थेट जाणवत नसले तरीसुद्धा ते नेटाने उभे राहू पाहतात. यापैकीच दिव्यांगत्वाची आणखी एक बाजू म्हणजे कर्णबधिरत्व होय. आज राज्यामध्ये 108 मूक-बधिर मुलांच्या शाळेमधील मुले शिक्षण घेत आहेत. त्यापैकीच एक आहे निपाणी येथील माऊली ग्रामीण अभिवृद्धी पुनर्वसन केंद्र संचालित नितीनकुमार मूक-बधिर निवासी विद्यालय. शाळेत शिवण, योगा, खेळ, सांस्कृतिक उपक्रम यावर भर दिला जातो. मुख्य म्हणजे जिल्हास्तरावर जेव्हा यांच्या स्पर्धा होतात तेव्हा त्यांच्या दिव्यांगांनुसारच त्यांचे गट पाडले जातात. नुकत्याच झालेल्या दिव्यांगांच्या विविध स्पर्धांमध्ये या शाळेने चॅम्पियनशिप मिळविली हे विशेष होय.
80 मूक–बधिर मुले
या शाळेत 80 मूक-बधिर मुले आहेत. जी निपाणी व आजूबाजूच्या खेड्यातील आहेत. अशा मुलांसाठी निवासी शाळांनाच प्राधान्य दिले जाते. शिवाय यांना शिकविण्यासाठी संकेत भाषा म्हणजेच साईन लँग्वेजचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. या शाळेत एकूण 8 शिक्षक मुलांना शिकवितात.
सरकारतर्फे शाळेला तांदूळ–गहू पुरवठा
चेअरमन गीता कदम यांचा मुलगा नितीन दिव्यांग असल्याने त्यांनी इतर मुलांसाठी ही शाळा सुरू केली. त्यांचीच मुलगी पंकजा कदम आज प्राचार्य असून त्यांनी विशेष शिक्षण घेतले आहे. सरकारतर्फे या शाळेला तांदूळ आणि गहू पुरवठा केला जातो. शाळेत आठवीपर्यंत शिक्षण दिले जात असून पुढील शिक्षणासाठी मुलांना इचलकरंजीला जाणे भाग आहे. त्यामुळेच पुढे बहुसंख्य मुलींचे शिक्षण खुंटते.
शासनातर्फे मुलांना 1200 रुपये पेन्शन
सरकार या मुलांना 1200 रुपये पेन्शन स्वरुपात देते. सरकारचे अनुदान पुरेसे नसल्याने अनेक देणगीदारांची मदत शाळेला झाली आहे. मात्र या शाळेत बाहेरचे कोणीही शिजवलेले अन्न स्वीकारले जात नाही. शिधा किंवा पैसे स्वीकारून त्यातून मुलांना भोजन दिले जाते. या मुलांसाठी यूडीआयडी ओळखपत्र सक्तीचे असून ते घेण्यासाठी बेळगावला बिम्सला यावे लागते. हे ओळखपत्रच मुलगा किंवा मुलगी मूक-बधिर असून शिक्षण घेत आहे, याचा पुरावा ठरते, याची माहिती समन्वयक मनीषा कदम यांनी दिली.