कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयची कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली. चंदा यांनी बँकेच्या धोरण आणि नियमांच्या विरोधात जाऊन कोटय़वधी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे.
वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन कंपनीला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3,250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये त्यांचे पैसे गुंतवले होते, असा दावा त्यात आहे. आरोपांनंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांचे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत चांगले व्यावसायिक संबंध होते.