मुंबई / वृत्तसंस्था
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक यांची येथील कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांना कर्ज घोटाळय़ाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची जामानावर सुटका करण्याचा आदेश दिला होता.
चंदा कोचर यांना अटक झाल्यानंतर भायखळा येथील महिला कारागृहात ठेवण्यात आले होते. तर त्यांचे पती दीपक कोचर यांना ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. आपली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे आपली त्वरित कारागृहातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती. तिची सुनावणी केल्यानंतर उच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर असल्याची टिप्पणी करत सुटका करण्याचा आदेश दिला.
सीबीआय चौकशी
चंदा कोचर यांच्यावर असलेल्या कर्ज घोटाळा आरोपाची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. चंदा कोचर प्रमुख अधिकारी होत्या तेव्हा आयसीआयसीआय बँकेने 2009 पासून 2018 पर्यंत व्हिडीओकॉन, सुप्रिम एनर्जी, व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड या व्हिडीओकॉन समूहातील कंपन्या, तसेच स्वतःचे पती दीपक यांची न्यूपॉवर रिन्युएबल्स ही कंपनी अशा कंपन्यांना 3,250 कोटी रुपयांचे कर्ज अवैधरित्या दिले, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. 2019 मध्ये या प्रकरणी एफआयआर सादर करण्यात आला होता. तेव्हापासून ही चौकशी सुरु आहे.
साटेलोटे असल्याचाही आरोप
चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला अवैध मार्गाने दिलेल्या कर्जाचा मोबदला म्हणून या उद्योगसमूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनी कोचर यांचे पती दीपक यांच्या कंपनीत 64 कोटी रुपयांची गुंतवणूक सुप्रिम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून केली असाही आरोप सीबीआयने ठेवला आहे.