ऑनलाईन टीम/तरुण भारत
चंढीगडमध्ये एका वसतीगृहातील विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. गर्ल्स वसतीगृहातील एका मुलीने इतर ६० मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून तरुणांना पाठवल्याचा आरोप आहे. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानेही घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लीक केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
इतर मुलींचे अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या मुलीला वसतिगृहाच्या एका खोलीत कोंडून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे वसीगृह परिसरात मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने सुरक्षा रक्षकांना वसतीगृहाचे मुख्य गेट बंद करावे लागले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनींनी पोलिसांची वाहने उलटी केली, ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तरुणींचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल करणारा तरुण शिमलाचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. एका खासगी विद्यापीठातील मुलींच्या बाथरूममधून व्हिडिओ बनवताना आरोपी तरुणीला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याचा व्हिडिओ विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने यूट्यूबवर पोस्ट केला आहे.
‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी युनिवर्सिटीसमोर प्रचंड गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा देत युनिवर्सिटीच्या गेटवर निदर्शने केली. आरोपी विद्यार्थ्याची ओळख पटली आहे. वसतीगृहात युनिवर्सिटी प्रशासनाने इतर विद्यार्थिनींसमोर त्याची चौकशी केली. विद्यार्थिनींनी विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमलाचा रहिवासी आहे. मात्र अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आलेली नाही.