Tarun Bharat

यापुढेही समाजासाठी चंदनापरी झिजायचे आहे!

Advertisements

ऍड. रमाकांत खलप यांचे उद्गार :  शानदार अमृतमहोत्सवपूर्ती सोहळा

रमाकांत खलपांचे स्थान अनेकांच्या ह्य्दयात : सुरेश प्रभू

खलप खिलाडू तसेच परोपकारीवृत्तीचे : किरण ठाकुर

खलपांनी वाचनाची कास धरुन प्रवास केला : कोमरपंत

खलपांच्या नावातच आहे जीवनाचे सारे सार : सामंत

प्रतिनिधी /पणजी

माझ्या आई वडिलांचे माझ्यावर झालेले संस्कार हीच माझी शिदोरी आहे. आतापर्यंत मला जे काही मिळाले आहे ते त्या शिदोरीच्या आधारे मिळाले आहे, अशा कृतज्ञतापूर्व भावना माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केल्या. आज आपण वयाची पंच्चाहत्तरी पूर्ण केली असून पुढचे जीवन हे चंदनापरी समाजासाठी झिजत झिजत जगायचे आहे, असेही ऍड. खलप म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांचा अमृतमहोत्सवपूर्ती सोहळा काल शुक्रवारी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ऍड. रमाकांत खलप बोलत होते. त्यांच्यासोबत पत्नी सौ. निर्मला खलप, प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सत्कार समितीचे अध्यक्ष दशरथ परब, उपाध्यक्ष व तरुण भारत समूहाचे सल्लागार संपादक किरण ठाकुर, डॉ. गुरुदास नाटेकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कुणाचाही द्वेश बाळगायचा नाही

राजकारण असो वा अन्य कोणत्याही कार्यामध्ये माणसामाणसात मतभेद असतात. त्या मतभेदांमुळे माणसाचा कायमस्वरूपी द्वेश बाळगायचा नाही, हे संस्कार माझ्या आई वडिलांनी नकळतपणे माझ्यावर केले. त्या संस्कारामुळे माझा स्वभावही तसाच बनला आणि त्याचाच पुढे मला फायदा झाला.

काकोडकर, पानकरमुळे आलो राजकारणात

आपण राजकारणात येणार याचा विचारही कधी केला नव्हता, मात्र काका पानकर आणि शशिकलाताई काकोडकर यांच्यामुळे आपण राजकारणात आलो. त्यामुळे त्यांना आजच्याघडीला विसरणे आपल्याला शक्य नाही. अनेक माणसे आहेत, ज्यांनी मला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचा मी ऋणी आहे, असेही खलप यांनी सांगितले.

…तर भावी पिढी रोबोट बनेल

परंपरा जपायची असल्यास साहित्याची गरज आहे. साहित्य संस्कृती टिकविण्यासाठी भाषा टिकली पाहिजे. भाषा-संस्कृती टिकली नाही तर पुढील पिढी भावनाशून्य रोबोट बनेल.

भाषा टिकली पाहिजे

कोकणीला आपण कधीच विराध केला नाही, मात्र कोकणीबरोबरच मराठी राज्यभाषा होणे तितकेच गरजेचे आहे. राजकीय पक्ष हे गाडीप्रमाणे आहेत. मात्र त्या गाडीत इंधन घालणारी आणि त्या गाडीतून प्रवास करणारी जनता आहे. जनतेचे हित जपणे फार महत्त्वाचे आहे. जनतेचे हित जपण्यासाठी सर्वसामान्य माणसाची संस्कृती परंपरा जपणे फार महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी भाषा टिकविणे गरजेचे आहे, असेही ऍड. खलप म्हणाले.

सुरेश प्रभू यांच्या हस्ते सत्कार

माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ऍड. रमाकांत खलप यांचा सत्कार केला. पुष्पहार शाल, श्रीफळ तसचे मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. सौ. निर्मला खलप यांची ओटी भरण्यात आली.

खलपांचे स्थान अनेकांच्या ह्य्दयात : सुरेश प्रभू

प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना प्रभू म्हणाले की सत्तेपुरते राजकारण करून भागत नाही. जीवनात स्वभाविकपणे साहित्य, कला अशा अनेक गोष्टींचा समावेश लागतो. ऍड. खलप यांनी साहित्य, संस्कृतीची जोपासना करीत राजकारण केले. अनेक क्षेत्रात योगदान दिले. संस्थात्मक स्तरावर जाऊन ते पोचले आणि अनेकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविले, असे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

विषमता टाळण्यासाठी सहकारक्षेत्र महत्त्वाचे

सहकार क्षेत्रामुळे खलप यांच्याशी माझी प्रथम मैत्री जुळली. जगात श्रीमंत आहेत आणि विषमताही आहे. ही विषमता टाळण्यासाठी सहकारक्षेत्र फार महत्त्वाचे आहे.  खलपांसारख्या अनेक अनुभवी माणसांची समाजाला गरज आहे, असेही प्रभू यांनी सांगितले. यावेळी ऍड. खलप यांचा स्वभाव तसेच त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देणारी अनेकांची भाषणे झाली.

खलप खिलाडू तसेच परोपकारीवृत्तीचे : किरण ठाकुर

सहकार क्षेत्र मजबूत होणे फार महत्त्वाचे आहे. सहकार क्षेत्र मजबूत झाल्यास खऱया अर्थाने समृद्धी येईल, असे तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी  संगितले. ऍड. खलप यांनी सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. केंद्रीयमंत्री म्हणून त्यांना खूप कमी वेळ मिळाला, मात्र कमी वेळेतही त्यांनी खूप मोठे काम केले आहे. दिलदार मित्र आणि दिलदार शत्रू ऍड. खलपांसारखा असावा. ते खिलाडूवृत्तीचे तसेच परोपकारी वृत्तीचे आहेत, असेही किरण ठाकुर यांनी सांगितले.

खलपांनी वाचनाची कास धरुन प्रवास केला : कोमरपंत

गेली पाच दशके ऍड. खलप हे सार्वजनिक कार्यात आहेत. मात्र त्यांच्यावर  राजकारणाचा कधी तवंग आला नाही. कला, संस्कृती जोपासत आणि वाचनाची कास धरून त्यांनी आपला प्रवास सुरुच ठेवला आहे. त्यांनी विधायक कार्याचा मनःपिंड जिवंत ठेवला. असे डॉ. कोमरपंत यांनी सांगितले.

खलपांच्या नावातच जीवनाचे सारे सार : सामंत

प्रा. अनिल सामंत यांनी ऍड. खलप यांच्याकडून आपण काय घेऊ शकतो याबाबत स्पष्टीकरण दिले. पुढे ते म्हणाले की खलप यांची शिक्षक, वकील, आमदार ते केंद्रीय मंत्री अशी वैभवसंपन्न कारकीर्द आहे. त्यांच्याकडे मनाची निर्मळता आणि प्रांजळता आहे. काटे असतानाही ते फुलाप्रमाणे फुलत राहिले. खलपांच्या नावातच त्यांचे सारे जीवन समाविष्ट आहे. र म्हणजे राजकारण, मा म्हणजे मानवता, का कला संस्कृती साहित्य, त जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणजेच रमाकांत असेही सामंत म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर दीप्रज्वलन करण्यात आले. 75 पणत्यांचा दीपस्तंभ प्रज्वलित करण्यात आला होता. दशरथ परब यांनी स्वागतपर भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते ऍड. रमाकांत खलप गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पौर्णिमा केरकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले तर नितीन कोरगांवकर यांनी आभार मानले.

Related Stories

काँग्रेस, राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्ड युती झाल्यास सत्ता निश्चित

Amit Kulkarni

रोटरॅक्ट क्लब वास्कोतर्फे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

Amit Kulkarni

राज्यात आज, उद्या मुसळधार पावसाचा इशारा

Patil_p

वाद नको, ऑक्सिजन मिळणे महत्वाचे : मुख्यमंत्री

Omkar B

जनतेला फसविणाऱया भाजपाला धडा शिकविण्यासाठी संघटित व्हा

Amit Kulkarni

कर्मचाऱयांवर याचिका सादर करण्याची वेळ आणू नका

Patil_p
error: Content is protected !!