पुणे / प्रतिनिधी :
नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या एमआरआय कक्षातील फोटो समोर आले. ते रुग्णालय खासगी आहे. तिथे काय करायचे, हे रुग्णालय प्रशासन ठरवेल. मात्र, आपण एक परिपक्व पक्ष असून, सत्तेत असल्याचा शिवसेनेला विसर पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यावे. शिवसेनेला आता जनताच पाहून घेईल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी सोमवारी येथे लगावला.
पाटील यांनी पुण्यातील विविध विषयांवर आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले, नवनीत राणा या उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचणार होत्या. त्या हनुमान चालिसा म्हणाणार होत्या. रावण चालिसा नाही. मात्र, त्यावरून शिवसेना जुन्या मोडमध्ये गेली आहे. दादागिरी सुरू आहे. राज्यात कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन काहीच अर्थ नाही. तक्रार लिहीपर्यंत चार फोन त्याला येतात. त्यामुळे आता न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात. 14 तारखेला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा 15 तारखेला होणारी देवेंद्र फडणवीसांची सभा विशेष असेल. त्यांची सभा होत आहे म्हणून आमची सभा होत नाही, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.