BJP on Shiv Sena VBA Alliance: महाविकास आघाडीच्या रुपानं आमचे विरोधक यापूर्वीच एकत्र आले आहेत. तरीही आम्ही राज्यात सरकार स्थापन करून ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या.विरोधकांच्या युतीमुळं आम्हाला फरक पडणार नाही.कुणीही कितीही युत्या केल्या तरी भाजप व मित्रपक्षांचाच विजय होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.आज ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. ही युती झाल्यास राज्यातील राजकीय व सामाजिक समीकरणं बदलू शकतात,असं बोललं जात आहे. यावर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय, एमआयएमच्या ओवेसी यांच्याशी सुद्धा युती करू शकतात, पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत.शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करत आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना मजबूत करत आहेत. आम्ही ५१ टक्के मतं मिळविण्याची तयारी करत आहोत. विरोधकांच्या युतीमुळं आम्हाला फरक पडणार नाही, असं बावनकुळे म्हणाले.

